नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ७६ दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश व हरियाणातून मोठे बळ देण्यात अलीकडे ज्या महापंचायती महत्वाची भूमिका बजावत आहेत तशाच शेतकऱ्यांच्या महापंचायती महाराष्ट्रासह इतर राज्यांतही आयोजित करण्याचे नियोजन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कृषी कायद्यांची तोंड भरुन स्तुती केली आहे.
ज्यांच्या अश्रूंमुळे या साऱ्या आंदोलनाचाच संजीवनी मिळाली ते भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत स्वतः येत्या २० फेब्रुवारीला (शनिवार) यवतमाळ येथे महापंचायतीला हजेरी लावतील अशी माहिती मिळाली आहे. टिकैत यांनी सरकारला गांधीजयंती पर्यंतची मुदत दिली आहे व पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरकारशी बोलायचे असेल तर नेमक्या कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर कॉल करावा याबद्दल सरकारनेच मार्गदर्शन करावे असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.
टिकैत आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात शेतकऱ्यांच्या जाहीर सभाही घेऊ शकतात असे सांगण्यात आले. त्यांच्या दौऱ्याचा व सभांचा कार्यक्रम निश्चित करताना लासलगावसारखी कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही गावांचा विचार सुरू असल्याचे समजते.
दरम्यान सरकार व शेतकरी यांच्यात पुन्हा चर्चा सुरू करण्यास दोन्ही बाजूंनी अनुकूलता दाखविण्यात आली तरी कायदे मागे न घेण्याचा सरकारचा ताठर पवित्रा व 'आंदोलनजीवी' सारख्या शब्दांवरून शेतकऱ्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी पाहता यापुढे चर्चेची तारीख, ठिकाण सरकारलाच ठरवावे लागेल असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. २२ जानेवारीनंतर सरकार व शेतकरी यांच्यात एकही चर्चा झालेली नाही. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांनंतर ही कोंडी चर्चेने फुटण्याचे मार्ग सरकारनेच बंद करून टाकल्याचे शेतकरी नेते मानतात.
यापूर्वीच्या अखेरच्या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी, दीड वर्षे कायद्यांना स्थगितीचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. शेतकऱ्यांनी त्यावर निर्णय घेऊन सरकारला कळवावे असे सांगून चेंडू शेकतऱ्यांच्या कोर्टात टाकला होता. शेतकऱ्यांनी सराकरचा तो प्रस्ताव फेटाळल्याने चर्चेची पुढील तारीख अद्याप अनिश्चित आहे. जोवर शेतकरी सरकारच्या नव्या प्रस्तावावार निर्णय घेत नाहीत तोवर पुन्हा चर्चा शक्य असल्याचे सरकारच्या गोटातून सांगण्यात येते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर तीनही कृषी कायद्यांची जोरदार वकिली केली. दोन दिवसांपासून दिल्ली मुक्कामी असलेले नितीशकुमार यांनी परवा गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती व काल ते पंतप्रधानांना भेटले. हे कृषी कायदे छोट्या शेतकऱ्यांच्या विरोधात नाहीत तर ते त्यांच्याच हिताचे आहेत. सध्याच्या आंदोलनावर लवकरच परस्पर चर्चा होऊन तोडगा निघेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे व बिहारही तसाच अर्थसंकल्प पुडील आठवड्यात जाहीर करेल, असेही नितीशकुमार म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

