नसीरुद्दीन शहा भडकले अन् म्हणाले, आपण खराब अंतर्वस्त्रे का जगासमोर धूत आहोत?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार ही राज्ये आमनेसामने आले आहेत. या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
naseeruddin shah says debate about sushant singh rajput turning juvenile
naseeruddin shah says debate about sushant singh rajput turning juvenile

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार जुंपली आहे. या संपूर्ण प्रकारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे भडकले असून, त्यांनी हा विषय दिवसेंदिवस बालीशपणाचा होत असल्याची टीका केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

नसीरुद्दीन शहा यांनी फिल्म कम्पॅनिन या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या आत्महत्येनंतर सध्या सुरू असलेला प्रकार दिवसेंदिवस बालीशपणाचा होत आहेत. सध्या सुरू असलेली चर्चा अनावश्यक आहे. आपण आपली खराब अंतर्वस्त्रे सगळ्या जगासमोर का धूत आहोत? चित्रपट न मिळालेले कलाकार आता अचानक तक्रार करु लागले आहेत. त्यांच्यासारखे अनेक जण आहेत ज्यांना संधी मिळत नाही. प्रत्येक जण तक्रारच करीत राहिला तर ही चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वांत वाईट जागा ठरेल. मी स्पष्टपणे हे सांगतो की हेच चित्रपटसृष्टीचे वास्तव आहे. सुशांतला मृत्यूनंतर तरी लोक शांततेत राहू देतील, अशी मला आशा आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com