narendra modi will become longest serving prime minister of india | Sarkarnama

नरेंद्र मोदी घडवणार इतिहास; पंतप्रधान म्हणून करणार आणखी एक विक्रम

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदविणार आहेत. पहिला कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणारे पंडित जवाहरलाल नेहरु, मनमोहनसिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंक्तीत मोदी आधीच जाऊन बसले आहेत. 

नवी दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर नोंद आहे. आता मोदी आणखी एक विक्रम करणार आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयपेयी यांचा विक्रम मोडीत काढून ते नवा विक्रम पुढील आठवड्यात प्रस्थापित करतील. 

देशाच्या पंतप्रधानपदाचा पूर्ण कार्यकाळ झाल्यानंतर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पंतप्रधानांमध्ये मोदी यांचा समावेश आहे. याआधी हा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरु, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या नावावर आहे. मोदी हे नेहरु, वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या पंक्तीत आधीच जाऊन बसले आहेत. आता मोदी नवीन विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोदी यांच्या नावावर आहे. ते 4 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 या काळात मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राज्यातून देशाच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून सुरू असलेली त्यांची विजयी घोडदौड कायम आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळून मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळून ते पुन्हा पंतप्रधान बनले.  

अटलबिहारी वाजपेयी हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पदावर राहणारे बिगरकाँग्रेसी पंतप्रधान होते. वाजपेयी सुरुवातीला 1996 मध्ये 13 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात 1998 ते 2006 या काळात वाजपेयी हे 2 हजार 256 दिवस पंतप्रधानपदी होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान होऊन आज 2 हजार 262 दिवस पूर्ण झाले आहेत. वाजपेयी यांचा सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या बिगरकाँग्रेसी पंतप्रधानपदाचा विक्रम मागे टाकण्यास मोदी यांना आता पुढील आठवड्याची प्रतीक्षा आहे. 

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंडित नेहरू यांच्या नावावर आहे. ते 6 हजार 130 दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांचा क्रमांक आहे. त्या 5 हजार 829 दिवस पंतप्रधान होत्या. मनमोहनसिंग हे तिसऱ्या क्रमांकावर असून, अटलबिहारी वाजपेयी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. मोदी आता अटलबिहारी वाजपेयी यांचा सर्वाधिक काळ पदावर राहणाऱ्या बिगरकाँग्रेसी पंतप्रधानपदाचा विक्रम मोडीत काढणार आहेत. पुढील काळात ते आणखी कोणते विक्रम मोडीत काढतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख