narendra modi and amit shah greet warkaris on ocassion of aahsadhi ekadashi | Sarkarnama

मोदी, शहांनी वारकऱ्यांना दिल्या चक्क मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाचा दिवस असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीतून शुभेच्छा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

नवी दिल्ली : आषाढी वारीवर यंदा कोरोना महामारीचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर थेट वारीत जाण्याऐवजी वारकरी घरातूनच लाडक्या विठुरायाची आठवण काढत आहेत. आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारकरी बंधू -भगिनींना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. 'सकळ देवांचे माहेर | सकळ संतांचे निजमंदिर | ते हे पंढरपूर जाणावे ||' हा संत एकनाथांचा अभंगही अमित शहा यांनी उद्धृत केला आहे. 

मोदी आणि अमित शहा यांनी ट्विटरवर आषाढी एकादशीनिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी.

आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम इतर अनेक संतांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली अशा सर्व संतांना नमन, असे मोदींनी नमूद केले आहे. 

शहांनी म्हटले आहे की, आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकरी बंधू-भगिनींना शुभेच्छा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे; आणि सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तिर्थक्षेत्र म्हणजे पंढरी व श्रद्धास्थान म्हणजे पंढरीचा विठोबा ! 

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यासारख्या संतांनी विषमतेच्या भिंती दूर सारून समाजात समानता आणि सलोखा निर्माण केला. अश्या सर्व महान संतांना कोटी कोटी नमन. जय जय पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, असेही शहा यांनी म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख