भाजपचे नंदकिशोर यादव होणार बिहार विधानसभेचे अध्यक्ष? - Nandkishore Yadav May Become Bihar Assembly Speaker | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

भाजपचे नंदकिशोर यादव होणार बिहार विधानसभेचे अध्यक्ष?

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

नीतीश कुमार यांच्या मागच्या सरकारमध्ये रस्ते निर्माण मंत्री असलेले भाजप नेते नंदकिशोर यादव बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत. पूर्वीच्या विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी यांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता यादव हेच अध्यक्ष असतील असे सांगण्यात येत आहे

पाटणा : नीतीश कुमार यांच्या मागच्या सरकारमध्ये रस्ते निर्माण मंत्री असलेले भाजप नेते नंदकिशोर यादव बिहार विधानसभेचे नवे अध्यक्ष होण्याचे संकेत आहेत. पूर्वीच्या विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी यांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता यादव हेच अध्यक्ष असतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शपथ घेण्याच्या आज दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. 

दर मंगळवारी मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्याचा आपला प्रघात नीतीश कुमार यांनी कायम ठेवला आहे. या बैठकीत विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचे नांव निश्चित केले जाईल. हंगामी अध्यक्ष नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देतील. राज्यात दहा लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन एनडीएने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याबद्दल आजच्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

२३ नोव्हेंबरला बिहार विधानसभेचे पहिले अधिवेशन होणार आहे. एनडीएकडे १२५ आमदार आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांपेक्षा हा आकडा केवळ तीनने जास्त आहे. त्यामुळे सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप आपल्या खास नेत्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपवू इच्छितो. त्याच दृष्टीने नंदकिशोर यादव यांचे नांव निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

बिहारमध्ये अधिक जागा मिळूनही भाजपाने नितीशकुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. भाजपाला कितीही जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमार हेच राहतील, अशी भूमिका भाजपाच्यावतीने अमित शहा यांनी मांडली होती. प्रत्यक्ष निकालानंतर भाजपाने गेल्यावळीपेक्षा १९ जागा मिळविल्या तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाची सर्वाधिक पीछेहाट झाली. त्यामुळे भाजपाने आपला शब्द पाळायचे ठरविले तरी नितीशकुमार मुख्यमंत्री होण्यास नकार देतील अशी राजकीय अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, भाजपाच्या आग्रहाने का होईना नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. भाजपाकडून उपमुख्यमंत्रीपदाची नावे अधिकृतपणे कधी जाहीर होणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या पदाची सातव्यांदा शपथ घेतली आहे. बिहाराच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाची सर्वाधिकवेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख