mumbai police commissioner says no politician name has come up during probe | Sarkarnama

#SSRSuicide : कोणत्याही राजकारण्याचे नाव समोर आलेले नाही; पोलीस आयुक्तांचा खुलासा

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरून मोठा गदारोळ उडाला आहे. या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील तरुण राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता याबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी खुलासा केला असून, कोणत्याही राजकारण्याचे नाव चौकशीत समोर आले नसल्याचे म्हटले आहे.  

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

मुंबईच पोलीस आयुक्त परमबीरसिंग म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या चौकशीत कोणत्याही राजकारण्याचे नाव समोर आलेले नाही. याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्षाचे नावही समोर आले आहे. बिहार पोलिसांच्या पथकाला मुंबई पोलीस सहकार्य करीत आहेत. त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे अथवा नाही याबद्दल कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तसेच, सुशांतच्या घरी त्याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी पार्टी झाल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. 

सुशांतला बायपोलर डिसऑर्डर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्याच्या आत्महत्येला नेमके काय कारण ठरले याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. सुशांतची व्यवस्थापिका दिशा सॅलियन हिचा 8 जूनला मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो आणखी निराश झाला होता. सुशांतच्या खात्यावर 18 कोटी रुपये होते. त्यातील 4.5 कोटी रुपये अद्याप खात्यावर आहेत, असे परमबीरसिंग यांनी सांगितले. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख