खासदार डेलकरांच्या मृत्युचे पडसाद संसद भवनातही

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे अस्वस्थ झालेल्या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, शिवसेनेचे विनायक राऊत, अरविंद सावंत आदींचा समावेश होता
MP's Meeting Loksabha Chairperson Om Birla
MP's Meeting Loksabha Chairperson Om Birla

नवी दिल्ली : दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे अस्वस्थ झालेल्या खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, शिवसेनेचे विनायक राऊत, अरविंद सावंत आदींचा समावेश होता. डेलकर यांनी मृत्युआधी संसदेत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली. 

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचे वृत्त लोकसभेतील त्यांच्या सर्वच सहकारी खासदारांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या मोहन डेलकरांनी प्रशासकीय दडपशाही आणि असहाय्यतेतून आत्महत्येचा पर्याय अवलंबावा हे अत्यंत दुःखद आहे. त्यामुळे या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, डेलकर यांनी मृत्यूआधी संसदेत केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी या मागणीसाठी तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत याबाबत कठोर पावले उचलण्यासाठीची विनंती करण्यासाठी, हे शिष्टमंडळ बिर्ला यांना भेटले. 

या घटनेची त्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी विनंती सर्व खासदारांनी एका पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांना केली. यावेळी जम्मू-काश्मिर नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, बसपाचे रितेश पांडे, सपा नेते अखिलेश यादव, शिवसेनेचे विनायक राऊत आणि अरविंद सावंत, काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रे हे उपस्थित होते.

''लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोहन डेलकर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने आपल्याला कसे अपमानित केले व त्यांच्यावर टाकलेल्या दबावाचा स्पष्टपणे उल्लेख केला होता. त्यामुळे डेलकर यांना न्याय मिळावा ही खासदारांची भूमिका आहे. हा संसदेच्या एका सदस्याच्या जीवीताचाच नाही तर संसदेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.  संसदेचे स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्वे अबाधित राहावीत आणि कोणत्याही सदस्याला निर्भयतेने आणि स्वाभिमानाने आपले कर्तव्य बजावता यावे हे महत्त्वाचे असल्याने भविष्यात कोणत्याही सदस्याला दडपशाहीचा सामना करावा लागू नये याची दक्षता घेण्यात यावी आणि हे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवावं,''अशी  विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र सरकार एसआयटी नेमून या प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच याची सखोल  चौकशी करून महाराष्ट्र पोलिस सत्य उजेडात आणतील आणि मोहन डेलकर यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com