MP Police Says Vikas Dubey Entered Mahakal Mandir With VIP Pass | Sarkarnama

धक्कादायक : विकास दुबेकडे मिळाला मंदीर प्रवेशाचा 'व्हीआयपी पास'

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जुलै 2020

विकास दुबे प्रकरणावरून आता पुन्हा एकदा गुन्हेगार-पोलिस व राजकारणी यांच्यातल्या संबंधांबाबत चर्चा होऊ लागली आहे. कारण त्याच्याकडे महाकाल मंदीर प्रवेशाचा व्हीआयपी पास सापडला आहे

उज्जैन : आज सकाळीच उज्जैनच्या महाकाल मंदीरात अटक झालेल्या गँगस्टर विकास दुबेने 'व्हीआयपी पास' वर मंदीरात प्रवेश मिळवला होता, अशी धक्कादायक माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली आहे. विकास दुबे प्रकरणावरून आता पुन्हा एकदा गुन्हेगार-पोलिस व राजकारणी यांच्यातल्या संबंधांबाबत चर्चा होऊ लागली आहे. 

विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी २ जुलैच्या रात्री आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर अंधाधूंद गोळीबार केला होता. त्यात आठ पोलिस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरारी झाला होता. आज सकाळी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमधल्या महाकाल मंदीरात पकडण्यात आले. दरम्यान, त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही उज्जैनमध्येच पकडण्यात आले आहे.

विकास दुबेने महाकाल मंदीरात 'व्हीआयपी' पासच्या सहाय्याने प्रवेश मिळवला होता, अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांनी दिली आहे. हा पास त्याला कुणी दिला हे मात्र त्यांनी उघड केलेले नाही. आज सकाळी विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. आता मिळालेल्या माहितीनुसार दुबेने मंदीरात येताच प्रथम २५० रुपयांची देणगीची पावती घेतली. त्यानंतर तो मंदीरात आला. त्यावेळी तो बिथरलेला होता. काही वेळातच तो मी विकास दुबे आहे, मी कानपूरचा गँगस्टर विकास दुबे, असे तो ओरडू लागला. सुरुवातीला तेथे बंदोबस्तासाठी असलेले सुरक्षा रक्षक व पोलिसांचा त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, एका सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला महाकाल पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबे प्रकरणाची 'सीबीआय' चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. अॅलर्ट असताना विकास दुबे उज्जैनपर्यंत पोहोचला कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यातही काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे विकास दुबे पकडला गेला की शरण आला, अशी विचारणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख