लिफ्ट अपघातातून कमलनाथ बचावले - MP Ex CM Kamalnath Escaped from Lift Collapse Accident | Politics Marathi News - Sarkarnama

लिफ्ट अपघातातून कमलनाथ बचावले

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

कमलनाथ व त्यांचे काही सहकारी येथील डीएनएस रुग्णालयात दाखल असलेले माजी मंत्री रामेश्वर पटेल यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. पटेल रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर दाखल आहेत. हे सर्वजण लिफ्ट मध्ये गेले वर जात असताना लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने खळबळ माजली.

इंदूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ येथील एका रुग्णालयात माजी मंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना लिफ्ट अचानक कोसळली. या घटनेत कमलनाथ व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी सुदैवाने बचावले. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

रविवारी ही घटना घडली. कमलनाथ व त्यांचे काही सहकारी येथील डीएनएस रुग्णालयात दाखल असलेले माजी मंत्री रामेश्वर पटेल यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. पटेल रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर दाखल आहेत. हे सर्वजण लिफ्ट मध्ये गेले वर जात असताना लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार या लिफ्टची क्षमता पंधरा जणांची होती. मात्र, त्यात कमलनाथ यांच्यासह वीस जण होते. त्यामुळे अती वजनाने ही लिफ्ट कोसळली. 

ही घटना घडल्यानंतर इंजिनिअर बोलावून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेच्या वेळी कमलनाथ यांच्या सोबत माजी मंत्री जीतू पटवाली आणि सज्जनसिंह वर्मा हे देखिल होते. ही घटना घडल्याने कमलनाथ यांना जोरदार मानसिक धक्का बसला. रुण्यालयाने तातडीने त्यांचा रक्तदाब तपासून किरकोळ उपचार केले. याबाबत प्रदेश काँग्रेसने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ही लिफ्ट दहा फूट खाली कोसळली. लिफ्ट कोसळल्यानंतर लिफ्टमध्ये धूर आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. दहा पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर दरवाजा उघडून या सर्वांना बाहेर काढण्यात यश आले, असे त्यात म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख