राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळालेले चाचा शरीफ आहेत तरी कोण ? - mohammad sharif invited for ram mandir bhoomi pujan ceremony in ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळालेले चाचा शरीफ आहेत तरी कोण ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

राम मंदिराचे उद्या अयोध्येत भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार लगबग अयोध्येत सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत लगबग सुरू झाली असून, याचे निमंत्रण अयोध्येतील जागेबाबत न्यायालयीन लढ्यात सहभागी असणारे इकबाल अन्सारी  यांच्यानंतर आता अयोध्येतील चिरपरिचित व्यक्तिमत्व असलेले पद्मश्री चाचा शरीफ यांना देण्यात आले आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यानंतर मंदिराचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण मोहम्मद शरीफ यांना देण्यात आले आहे. त्यांन अयोध्येत चाचा शरीफ या नावाने ओळखले जाते. प्रकृतीने साथ दिली तर मी नक्कीच कार्यक्रमाला जाईन, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना भेटण्याची खूप इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरीफ यांचा व्यवसाय हा सायकल दुरूस्ती आहे. अयोध्येतील अली बेग परिसरात ते राहतात. मागील वर्षी त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला होता. 

शरीफ यांनी तब्बल 25 हजारहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. हिंदू आणि मुस्लिम हा भेद न पाहता ते शवांवर अंत्यसंस्कार करतात. ते रोज दफनभूमीत अथवा स्मशानभूमीत जाऊन बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. ते जर आले नाही तर पोलीस अथवा स्मशानभूमीचे कर्मचारी शरीफ यांच्याशी संपर्क साधतात. शरीफ हे बेवारस शवांवरील अंत्यसंस्काराचा खर्च स्वत:च करतात. 

शरीफ यांच्या चारपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या एक मुलगा अयोध्येत झालेल्या धार्मिक दंगलीत बळी पडला होता. त्यांच्या मुलावर बेवारस समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या एका घटनेने शरीफ यांचे पूर्ण जीवनच बदलले. त्यानंतर शरीफ यांच्या आयुष्याचे एकच ध्येय बनले ते म्हणजे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे. स्वत: आर्थिक झळ सोसूनही त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. काही लोकही त्यांना या कामासाठी मदत करीत असतात. आता सरकारने त्यांना राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण देऊन त्यांचा एकप्रकारे सन्मान केला आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख