'काहींचा' काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद झाला : पंतप्रधानांची विरोधकांवर टीका - Modi Slams Opposition Parties over Farm Bills | Politics Marathi News - Sarkarnama

'काहींचा' काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद झाला : पंतप्रधानांची विरोधकांवर टीका

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

शेतकरी ज्या अवजारांची आणि यंत्रांची पुजा करतात त्यांना आग लावून हे लोक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. गेली अनेक वर्षे आपण किमान आधारभूत किंमत आणू अशी आश्वासने यांनी दिली. पण ती कधीच पाळली नाहीत. आमच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींच्या अनुषंगाने आता निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड येथे बोलताना केले

नवी दिल्ली : ''विरोधक किमान आधारभूत किंमतीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. देशात किमान आधारभूत किंमत असेलच शिवाय शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकता येईल. परंतु, काही जणांना हे स्वातंत्र्य दुखते आहे. कारण त्यांचा काळा पैसा कमावण्याचा आणखी एक मार्ग सरकारने बंद केला आहे,'' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यावर हल्लाबोल केला. 

नमामी गंगा योजनेअंतर्गत उत्तराखंड येथील सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. "शेतकरी आता आपला शेतमाल कुणालाही आणि कुठेही विकू शकतील. पण जेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्याचे हक्क देत आहे, त्यावेळी विरोधक त्याला विरोध करत आहेत. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करु नये असे त्यांना वाटते. मध्यस्थांनी नफा कमवावा, अशी यांची इच्छा आहे. हे लोक शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यालाच विरोध करत आहेत,'' असे मोदी यावेळी म्हणाले. 

केवळ विरोधासाठी विरोध

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "शेतकरी ज्या अवजारांची आणि यंत्रांची पुजा करतात त्यांना आग लावून हे लोक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. गेली अनेक वर्षे आपण किमान आधारभूत किंमत आणू अशी आश्वासने यांनी दिली. पण ती कधीच पाळली नाहीत. आमच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींच्या अनुषंगाने आता निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशनात शेतकरी, कामगार, आरोग्य अशा अनेक विषयांबाबत सरकारने निर्णय घेतले. या निर्णयांमुळे कामगार, युवा वर्ग, महिला, शेतकरी यांचा लाभ होणार आहे. मात्र, काही विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करत आहे हे देशातील जनता पहाते आहे,"

संरक्षणाच्या मुद्द्यावरुनही टीका

देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरुनही मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. "गेल्या कित्येक वर्षांत या लोकांनी (विरोधकांनी) आपल्या सैन्य दलांच्या सक्षमीकरणासाठी काहीही केले नाही. हवाई दल राफेल विमाने मागत होते. पण त्यांनी कधीही ऐकले नाही. जेव्हा आमच्या सरकारने फ्रान्सबरोबर राफेल विमानांबाबत करार केला तेव्हा विरोधकांना त्रास व्हायला लागला. चार वर्षापूर्वी आपल्या शूर सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. पण विरोधक याचे पुरावे मागत राहिले. सर्जिकर स्ट्राईक्सना विरोध करुन विरोधकांनी आपला हेतू लोकांना दाखवून दिला आहे." असे मोदी म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख