नितीश कुमार मंत्रीमंडळातले ५७ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे - Majority of Nitish Kumar Ministers Have Criminal Record | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

नितीश कुमार मंत्रीमंडळातले ५७ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

बिहारमधील भाजप आघाडी सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात प्राध्यापक भरती घोटाळ्यातील आरोपी डॉ. मेवालाल चौधरी यांचा समावेश वादग्रस्त ठरला आहे. मात्र नितीशकुमार यांच्या पहिल्या टप्यातील मंत्रिमंडळात गुन्हेगारी मंत्र्यांचीच रेलचेल दिसत आहे

नवी दिल्ली : बिहारमधील भाजप आघाडी सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात प्राध्यापक भरती घोटाळ्यातील आरोपी डॉ. मेवालाल चौधरी यांचा समावेश वादग्रस्त ठरला आहे. मात्र नितीशकुमार यांच्या पहिल्या टप्यातील मंत्रिमंडळात गुन्हेगारी मंत्र्यांचीच रेलचेल दिसत आहे. तब्बल ५७ टक्के मंत्र्यांवर गुन्हेगारी व ४३ टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. भाजपचे सर्वाधिक ६७ टक्के, संयुक्त जनता दलाचे ३३ टक्के व जीतनराम मांझी यांच्या एनडीएतील हिंदुस्तान आवाम पक्ष (हम) व विकासशील इन्सानपक्ष (व्हीआयपी) या पक्षांचे दोन्हीच्या दोन्ही मंत्री गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत.

भागलपूरच्या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले चौधरी तारापूरमधून निवडून आले आहेत. ते सध्या जामीनावर तुरूंगाबाहेर आहेत. या मंत्रिमंडळातील ते सर्वांत श्रीमंत मंत्रीही असून त्यांच्याकडे घोषित संपत्ती १२.३१ कोटी आहे. २०१७ मध्ये बाहेर आलेल्या सहायक प्राध्यापक गैरव्यवहारातील चोधरी हे मुख्य आरोपी आहेत. त्यांना नितीशकुमार आता बिहारचे शिक्षममंत्री करणार का, असा उपरोधिक सवाल विरोधकांनी विचारला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यापुढेही क्राईम, करप्शन व कम्युनॅलीझम यावरील प्रवचने सुरूच ठेवतील असा हल्ला चढविला आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्या खास उपस्थितीत नितीशकुमार यांच्यासह ज्या १५  मंत्र्यांनी शपथ घेतली त्यातील १४ जणांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आदारे बिहार इलेक्‍शन वॉच व लोकशाही सुधारणांसाठीच्या एडीआर या संघटनेने बिहार सरकारचा गुन्हेगारी तोंडवळा समोर आणला आहे. भाजपच्या ६ पैकी ४ , जदयूने ६ पैकी २ कलंकितांना मंत्री केले आहे.

नितीशकुमार यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात सारेच करोडपती आहेत. मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती प्रत्येकी जवळपास ४ कोटी इतकी आहे. ७२.८९  लाख रूपये संपत्ती दाखविणारे अशोक चौधरी 'सर्वांत गरीब' ठरले आहेत. यातील १०  मंत्री पदवीधर व त्यापेक्षा जास्त शिकलेले असून ४ जण ८ वी ते १२ वी पर्यंत शिकलेले आहेत. १४ पैकी ६ मंत्र्यांचे वय ४१ ते ५० व ८ जणांचे वय ५१ ते ७५ च्या घरात आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख