आदित्य ठाकरेंनी मौन सोडले अन् म्हणाले, हे तर गलिच्छ राजकारण पण मी संयम बाळगलाय! - maharashtra tourism minister aditya thackeray clears air about sushant singh rajput case | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले अन् म्हणाले, हे तर गलिच्छ राजकारण पण मी संयम बाळगलाय!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या तपासावरुन महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार असा वाद सुरू झाला आहे. यात आदित्य ठाकरे यांचेही नाव घेतले जाऊ लागल्याने अखेर त्यांनी मौन सोडले आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येने बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार असा वाद सुरू झाला आहे. यात शिवसेनेचे नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव घेतले जाऊ लागल्याने अखेर त्यांनी मौन सोडले आहे. 

आदित्य ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रकरणी भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'कोरोना' संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र सरकार 'कोरोना'चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. 

मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूड ' हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख