राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब या मंगलप्रसंगी असायला हवे होते..!

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या प्रसंगी राज ठाकरे यांनी या कार्याला शुभसंदेश दिला आहे.
maharashtra navnirman sena chief raj thackeray wishes ram mandir bhoomi pujan
maharashtra navnirman sena chief raj thackeray wishes ram mandir bhoomi pujan

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  उद्या (ता.५) होत आहे. या कार्यक्रमाची अयोध्येत जोरदार लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राम मंदिरासाठी सर्वसहमतीचे वातावरण तयार व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवणही त्यांनी काढली आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.  

मागील वर्षी 9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील जागा राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यावी, असा आदेश केंद्र सरकारला दिला होता. त्यानंतर या वर्षी 5 फेब्रुवारीला अयोध्येत मंदिराचे बांधकाम करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याची घोषणा 5 फेब्रुवारीला करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर हे ट्रस्ट देखरेख ठेवणार आहे. 

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचे बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही. ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं. अगतिकतेचं. ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयन केले ते निक्षितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल हाची मला खात्री आहे. तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, असे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com