महाराष्ट्राच्या सीमा बंदच- मुख्यमंत्री येडियुराप्पा : स्थलांतरितांकडून एकाच फेरीचा खर्च घेण्याची सूचना

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने महाराष्ट्राच्या सीमा बंद ठेवून तेथील कुणालाही राज्यात प्रवेश दिला जाऊ नये. गोवा कोरोनामुक्त झाला असल्याने तेथून येणाऱ्या स्थलांतरीतांची योग्य तपासणी करुनच राज्यात घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या
Maharashtra Karnataka Borders will not be opened say Yediyurappa
Maharashtra Karnataka Borders will not be opened say Yediyurappa

बेळगाव : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने महाराष्ट्राच्या सीमा बंद ठेवून तेथील कुणालाही राज्यात प्रवेश दिला जाऊ नये. गोवा कोरोनामुक्त झाला असल्याने तेथून येणाऱ्या स्थलांतरीतांची योग्य तपासणी करुनच राज्यात घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शनिवारी (ता. २) लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार सोमवारपासून (ता. ४) व्यवहार सुरळीत करावेत, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्थलांतरीतांचा मुद्दा उपस्थित केला. स्थलांतरितांना बस उपलब्ध करून देताना शासनाने प्रवासाचा दोन्हीकडचा खर्च स्थलांतरीत कामगारांकडून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी केवळ जाण्याचा खर्च घेऊन परतीचा खर्च कामगार निधीतून भरून घेण्यासाठी शासनाने आदेश बजावावा, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केवळ जाण्याचा खर्च घेण्याची सूचना केली.

पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने अशा ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती दिली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेबागेवाडी गावचा मुद्दा उपस्थित केला. सीलडाऊनमुळे चार हजार कुटुंबे हलाखीत जगत असून शासनाकडूनच जीवनावश्‍यक साहित्याचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन महिने पुरेल इतका शिधा यापूर्वीच शासनाने दिला असून दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आणखी मदत त्याठिकाणी पोचविण्याचा सल्ला दिला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, खासदार प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य महांतेश कौजलगी, आमदार पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे, अनिल बेनके, महांतेश दोडगौडर, महेश कुमठळ्ळी, महादेवप्पा यादवाड आदी उपस्थित होते.

रोहयो कुटुंबांना मदत

हिरेबागेवाडीत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळल्याने कामगार विभागाशी चर्चा करुन तेथील प्रत्येक रोहयो कुटुंबाच्या खात्यावर दोन हजार रुपये बॅंक जमा करण्याची सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर निर्णय घेताना २ हजार रुपये की तितक्‍याच किंमतीचे साहित्य द्यावे यावर चर्चा करण्यास सुचविले.

कर्नाटकातल्या नवीन मार्गदर्शक सूचना

- नवीन मार्गदर्शक सूचना ४ मे ते १७ मे पर्यंत लागू
- ग्रीन झोन जिल्ह्यात बस वाहतुकीस परवानगी
- १७ मे पर्यंत सर्व प्रकारच्या विमान उड्डाणे रद्द
- रेड झोन जिल्ह्यात शॉपिंग कॉम्प्लेक्‍स मॉल बंदच
- शाळा महाविद्यालये सुरू रहाणार नाहीत.
- खासगी कंपन्या, कार्यालये उघडू शकतात
- रुग्णालये, ओपीडी सुरू करण्याच्या सूचना
- रेड झोनमध्ये बाहेर येणाऱ्याकडे आरोग्य सेतू ऍप हवे
- रेड झोनमधील सलून आणि ब्युटी पार्लर बंदच
- परप्रांतीयांना बसने जाताना एकतर्फी भाडे देणे बंधनकारक
- बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे निर्देश
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com