#SSRSuicide : थेट गृहमंत्री देशमुखांनीच केला सीबीआय चौकशीच्या मागणीचा निषेध

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. आता या प्रकरणावरुन महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार असे चित्र निर्माण झाले आहे. याला राजकीय रंग दिला जात असल्याचाही आरोप होत आहे.
maharashtra home minister anil deshmukh condemns demand for cbi inquiry
maharashtra home minister anil deshmukh condemns demand for cbi inquiry

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याचा निषेध थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. महाराष्ट्र पोलीस योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. यातील सत्य समोर आणण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असून, याचा मी निषेध करतो. 

बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चॅप्टर 12 आणि 13 अंतर्गत बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्याचा तपास हा गुन्हा घडला तेथेच व्हायला हवा. याचबरोबर गुन्ह्याची न्यायालयीन कार्यवाहीसुद्धा याच ठिकाणी होणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी नमूद केले आहे. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com