ब्रेकिंग : सुशांतच्या आत्महत्येवरुन बिहारनंतर आता महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात - maharashtra government files caveat in rhea chakraborty plea in supreme court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग : सुशांतच्या आत्महत्येवरुन बिहारनंतर आता महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 जुलै 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरुन मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार आमनेसामने आले आहेत. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही महाराष्ट्र सरकारने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. हा एफआयआर पाटण्यावरुन मुंबईला वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर बिहार सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता बिहारच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र सरकारही सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

पाटण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबईला वर्ग करावा, अशी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर बिहार सरकारने काल सुशांतच्या वडिलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, सुशांतच्या वडिलांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. 

या विषयी महाराष्ट्र सरकारचे वकील सचिन पाटील म्हणाले की, रिया चक्रवर्तीने पाटण्यातील एफआयआर मुंबईला वर्ग करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर महाराष्ट्र सरकारने कॅव्हेट दाखल केले आहे. रियाच्या याचिकेवर निर्णय देण्याआधी न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख