नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ५७ दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अखेर परवानगी दिल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिली. या वेळी कोणतीही अप्रिय घटना होणार नाही व रॅलीनंतर लगेचच आंदोलक शेतकरी पुन्हा सीमांवर परततील याबाबत शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून दिल्ली पोलिसांनी रीतसर हमी मागितल्याचेही समजते.
ही रॅली ऐतिहासिक असेल व सारे जग ती पाहील असेही पाल यांनी सांगितले. दिल्लीतील वेगवेगळ्या ५ रस्त्यांवर शांततापूर्ण मार्गांनी निघणाऱ्या या रॅलीत किमान सुमारे सात ते आठ हजार ट्रॅक्टर सहभागी होतील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. कृषी कायद्यांबाबत आंदोलनकर्त्या 41 संघटनांचे नेते व शेतकरी यांच्यात काल झालेली १२ व्या फएरीची चर्चाही निष्फळ ठरली. मात्र कालच्या चर्चेत सरकारचा सूर काहीसा तप्त झाल्याचे दिसले. कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी नेते ठाम असून तसे करण्यास सरकारची तयारी नाही. शेतकऱ्यांना पाहिजे ते बदल कायद्यांत सुचविण्याचा पर्याय सरकार देत आहे. या ताठर बूमिकेमुळे आंदोलनाबाबतची कोंडी फुटलेली नाही. दुसरीकडे डाव्या पक्षांचे अस्तित्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर शेतकरी आंदोलन सुरू झाले या योगायोगाकडे भाजप नेते लक्ष वेधतात.
आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नसतानाच शेतकरी नेत्यांनी हजारो ट्रॅक्टरची रॅली दिल्लीतील रस्त्यांवर काढण्याचा इरादा पक्का केल्याने दिल्ली पोलिसांवरील ताण वाढला होता. पोलिस अधिकारी व शेतकरी नेते यांच्यात याबाबत तीन बैठका झाल्या. त्यात पोलिसांनी दिलेला पर्यायी मार्गांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. अखेर चर्चेअंती दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिल्याचे पाल यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जाहीर केले. ही रॅली शांततापूर्ण मार्गाने काढण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली आहे असे योगेंद्र यादव यांनी सांगितले. पाल म्हणाले की पोलिस आम्हाला अडवणार नाहीत. ही ट्रॅक्टर परेड २६ जानेवारीला वेगवेगळ्या ५ सीमांच्या लगतच्या रस्त्यांवर सुमारे १०० किलोमीटरच्या अंतरावरून जाईल. यासाठी जितका वेळ लागेल तेवढा पोलिसांनी आम्हाला दिला आहे.
या रॅलीसाठी पंजाबातील हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीकडे आज व उद्या रवाना होतील असे भारतीय किसान संघटनेचे महासचिव सुखदेवसिंग कोकरीकला यांनी सांगितले. हरियाणातही करनाल, अंबाला, रोहतक, भिवानी, गुडगाव, कुरुक्षेत्र आदी भागांतून शेतकरी निघाले आहेत.
महाराष्ट्राचाही देखावा असणार
प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीचा सविस्तर कार्यक्रम उद्या जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ व संयुक्त संघर्ष मोर्चाचे हजारो शेतकरी यात सहभागी होणार आहेत. संघर्ष मोर्चाच्या वतीने आपला एक चित्ररथही सज्ज केला असून त्यात छत्रपती शिवरायांच्या काळातील महाराष्ट्रातील कृषीसंस्कृती हा देखावा उभारण्यात येणार आहे, असे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

