madhya pradesh cabinet expansion delayed due to differences between jyotiraditya scindia and shivraj singh chauhan | Sarkarnama

ज्योतिरादित्य अन् शिवराजसिंहांचे गणित काही जुळेना..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

मध्य प्रदेशातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांना मंत्रिपद देण्यावरुन विस्तार लांबणीवर पडत आहे.  

नवी दिल्ली :  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यांनी काल दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाब चर्चा केली होती. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार तातडीने होईल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची राजकीय गणित जुळत नसल्याने तो आणखी लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसपासून दूर झालेले आणि राज्यातील सत्तापालटास कारणीभूत ठरलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 9 समर्थक आमदारांना मंत्रिपद हवे आहे. शिंदे यांच्यासह त्यांच्या 23 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील 11 जणांना त्यांनी मंत्रिपद मागितले होते. शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यात शिंदे यांच्या दोन समर्थकांचा समावेश होता. 

आता शिवरासिंह चौहान यांना त्यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील चेहरे पुन्हा घ्यायचे आहेत. याचवेळी शिंदे यांच्या 9 समर्थक आमदारांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे यांचे समर्थक आमदार आणि मंत्रिमंडळातील जुने सहकारी ही संख्या वाढत आहे. मात्र, याचे राजकीय गणित जुळत नसल्याने विस्तार लांबणीवर पडत आहे. राज्यात तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिंदे आपल्या गटासह भाजपमध्ये गेल्याने वर्षभरापूर्वीचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. नंतर भाजपने येथे सरकार बनवले. त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरू असल्याने चौहान यांच्यासह तीनच मंत्र्यांनी शपथ घेतली. मध्य प्रदेशाच्या विधानसभा सदस्य संख्येनुसार 35 मंत्री बनू शकतात. 

चौहान यांना काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार आणि राज्यातील भाजप नेते यांच्यात समतोल साधण्याची कसरत करावी लागणार आहे. शिवराजसिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर काही बोलण्यास नकार दिला. राज्यातील जातीय समीकरणांकडेही भाजपला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराचा थेट परिणाम प्रस्तावित 24 विधानसभा पोटनिवडणुकांवर होऊ शकतो.

मध्य प्रदेशातील सत्तांतरानंतरच्या या पहिल्या व बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा शपथविधी होईल. राज्यपाल लालजी टंडन गंभीर आजारी असल्याने राज्यपालपदाची सूत्रे पटेल यांच्याकडे  सोपविण्यात आली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख