मध्य प्रदेशात उद्याच मंत्रिमंडळ विस्तार; ज्योतिरादित्य की शिवराजसिंहांचे पारडे जड?

मध्य प्रदेशच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या मंत्री शपथ घेतील, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच जाहीर केले आहे.
madhya pradesh cabinet exapansion will be tommorrow says shivraj singh chauhan
madhya pradesh cabinet exapansion will be tommorrow says shivraj singh chauhan

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. याआधी आज राज्यपालपदाची शपथ आनंदीबेन पटेल घेणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज माहिती दिली. यामुळे अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरुन सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. 

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यांनी नुकताच दिल्ली दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार तातडीने होईल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची राजकीय गणित जुळत नसल्याने तो आणखी लांबणीवर पडला होता. अखेर यासाठी उद्याचा मुहूर्त निघाला आहे. 

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन हे प्रकृती अस्वास्थामुळे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आज आनंदीबेन पटेल या राज्यपालपदाची शपथ घेतील. उद्या विस्तारीत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेल्या विलंबाबाबत विचारले असता शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मंथनातून केवळ अमृत निघते आणि शिव हलाहल पचवतो. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसपासून दूर झालेले आणि राज्यातील सत्तापालटास कारणीभूत ठरलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 9 समर्थक आमदारांना मंत्रिपद हवे आहे. शिंदे यांच्यासह त्यांच्या 23 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील 11 जणांना त्यांनी मंत्रिपद मागितले होते. शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यात शिंदे यांच्या दोन समर्थकांचा समावेश होता. 

आता शिवरासिंह चौहान यांना त्यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील चेहरे पुन्हा घ्यायचे आहेत. याचवेळी शिंदे यांच्या 9 समर्थक आमदारांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे यांचे समर्थक आमदार आणि मंत्रिमंडळातील जुने सहकारी ही संख्या वाढत आहे. मात्र, याचे राजकीय गणित जुळत नसल्याने विस्तार लांबणीवर पडत होता. राज्यात तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शिंदे आपल्या गटासह भाजपमध्ये गेल्याने वर्षभरापूर्वीचे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. नंतर भाजपने येथे सरकार बनवले. त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरू असल्याने चौहान यांच्यासह तीनच मंत्र्यांनी शपथ घेतली. मध्य प्रदेशाच्या विधानसभा सदस्य संख्येनुसार 35 मंत्री बनू शकतात. 

चौहान यांना काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार आणि राज्यातील भाजप नेते यांच्यात समतोल साधण्याची कसरत करावी लागणार आहे. शिवराजसिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर काही बोलण्यास नकार दिला. राज्यातील जातीय समीकरणांकडेही भाजपला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराचा थेट परिणाम प्रस्तावित 24 विधानसभा पोटनिवडणुकांवर होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com