राहुल गांधी म्हणाले, मोदीजी तुमचे लॉकडाउन पूर्णपणे फसले

लॉकडाउनच्या काळातील केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून, ती खूप भीषण असेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
Lockdown has failed, centre must spell out reopening strategy says Rahul Gandhi
Lockdown has failed, centre must spell out reopening strategy says Rahul Gandhi

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चार टप्प्यातील राष्ट्रीय लॉकडाउनचे पाऊल सपशेल अपयशी ठरले असून, त्यातून हाती काही लागलेले नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. 

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देश पुन्हा खुला करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धोरणाबाबत जनतेला स्पष्टीकरण हवे आहे. सरकार स्थलांतरितांना आणि राज्य सरकारांना कशा प्रकारे मदत करणार आहे, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. देशात कोरोनाविषाणूचा प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने पुढील दिशा काय ठरविली आहे, याबद्दल जनता प्रश्न विचारत आहे. केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांनी पुन्हा उभारी घेणे शक्य नाही. सरकारने जनता आणि उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास फार गंभीर परिस्थिती निर्माण होईल. 

संसर्ग  वाढलेला असताना लॉकडाउन शिथिल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले परिणाम या चार टप्प्यातील लॉकडाउनमधून समोर आलेले नाहीत. भारतात लॉकडाउनचा उद्देश आणि कारण हे दोन्ही अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, की जो कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. 

गरीबांच्या हातात पैसे द्या 

गरीब आणि लघु व मध्यम व्यावसायिकाच्या हातात पैसे न दिल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. देश सध्या या फसलेल्या लॉकडाउनचे परिणाम भोगत आहे. मी काही या विषयातील तज्ञ नाही मात्र, सरकारने योग्य पद्धतीने नियोजन करुन आणि व्यवस्थित पद्धतीने सर्व खुले करायला हवे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याची गरज असून, हे केवळ गरीब आणि लघु व मध्यम व्यावसायिकांच्या हातात थेट पैसे देऊन घडू शकेल, असे त्यांनी सांगितले. 

लडाख, नेपाळबाबत स्पष्टीकरण द्या 

लडाख आणि नेपाळमध्ये जे काही सध्या घडत आहेत, याबद्दल सरकारने पारदर्शकता ठेवायला हवी. चीनच्या सीमेवर सध्या जे घडत आहे, याविषयी केंद्र सरकारने जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आम्ही केवळ सरकारला पाठिंबा देणारे आहोत, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकार अपयशी झाल्याची टीका राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी त्यांना महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, काँग्रेस तेथे सत्तेत सहभागी आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारला काँग्रेसचा केवळ पाठिंबा आहे. पक्ष तेथे सत्तेत सहभागी नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देत असलो तरी तेथील महत्वाच्या निर्णयात आमचा काहीही सहभाग नाही. सध्याच्या आव्हानात्मक काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला पूर्णपणे मदत करण्याची आवश्यकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com