lockdown averted millions of corona cases claims central government | Sarkarnama

...तर देशातील रुग्णसंख्या 70 लाखांवर गेली असती

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे शक्य झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. लॉकडाउन नसते तर, रुग्णसंख्या अनेक पटींनी वाढली असती, असेही सरकारने म्हटले आहे. 

नवी दिल्ली ः देशात लॉक़डाउन करण्यात आले नसते तर, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाख या दरम्यान पोचली असती आणि सुमारे 1.2 ते 2.1 लाख नागरिकांना जीव गमावावा लागला असता, असे केंद्रीय  सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटले आहे. 

लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या कमी राहण्यास मदत झाली, असा दावा मंत्रालयाने केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार, देशात लॉकडाउनमुळे कोरोनाचे 14 ते 29 लाख रुग्ण कमी झाले आणि पर्यायाने 37 हजार ते 78 हजार जणांचा जीव बचावला. जनतेच्या पूर्ण सहकार्याने लॉकडाउन सुरु असल्याने त्याचा फायदा होत आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे सुमारे 78 हजार जणांचे प्राण वाचले आहेत. तसेच, दोन तज्ज्ञांनी केलेल्या या मॉडेलनुसार, लॉकडाउनमुळे कोरोनाचे 23लाख रुग्ण आणि 68 हजार मृत्यू टळले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, लॉकडाउनमुळे सुमारे 15.9 लाख रुग्ण आणि 51 हजार मृत्यू टाळता आले, असेही मंत्रालयाने नमूद केले आहे. सांख्यिकी मंत्रालय आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउनमुळे कोरोनाचे 29 लाख रुग्ण आणि 54 हजार मृत्यू टळल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. 

देशातील रुग्णसंख्या सव्वा लाखावर 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मागील 24 तासांत देशभरात तब्बल 6 हजार 600 रुग्ण सापडले आहेत. यातील सुमारे 3 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 25 हजार 101 झाली आहे. 

कोरोनाचा मृत्यूदर कमी 

देशातील कोरोनाचा मृत्यूदर आता 3.13 टक्क्यांवरुन आता 3.02 टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या शुक्रवारी 137 होती. यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा 3 हजार 720 झाला आहे. 

राज्यात रुग्णसंख्या वाढतेय 

गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाच्या २ हजार ९४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,५८२ झाली आहे.  राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १ हजार ५१७ झाली आहे. 

चीनमध्ये आढळले २८ नवे संशयित रुग्ण 

कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या भागातून सर्व जगभरात पसरला त्या वुहान प्रांतामध्ये २८ नवे कोरोनाचे संशयित रुग्ण सापडल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या रुग्णांची कोरोनाचाचणी करण्यात आली असून अद्यापपर्यंत त्याचे रिपोर्ट आले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चीनमध्ये शुक्रवारी ३७० नवे कोरोना रुग्ण सापडले असून यातील २६ जण हे परदेशातून चीनमध्ये परतलेले नागरिक असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली असून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षण आढळली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले असून यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख