मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. रिया हिची चौकशी करावयाची होती परंतु, ती बेपत्ता असल्याचे बिहार पोलिसांनी म्हटले होते. आता यावर रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी खुलासा केला असून, बिहार पोलिसांच्या अधिकारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत.
राजकीय फायद्यासाठी राजकीय रंग दिला जात आहे...#Sarkarnama #सरकारनामा #SarkarnamNews #MarathiNews #PoliticalNews #SushantSinghRajput #RheaChakraborty #Bihar #Maharashtra #SupremeCourt #FIR #Mumbai #Police #Bollywood #Viral #ViralNews #SSRSuicidehttps://t.co/87Dbn7Rxly
— Sarkarnama (@MySarkarnama) August 2, 2020
सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
रिया हिची चौकशी करावयाची असून, ती बेपत्ता असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला होता. याला रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उत्तर दिले आहे. रियाला अद्याप चौकशीसाठी कोणतेही समन्स मिळालेले नाही, असा दावा त्यांनी केला. याचबरोबर बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
सतिश मानेशिंदे म्हणाले की, बिहार पोलीस हे रिया बेपत्ता असल्याचे म्हणत आहेत. हे चुकीचे आहे. अद्याप आजपर्यंत बिहार पोलिसांकडून चौकशीसाठी रियाला समन्स मिळालेले नाही. रियाचा जबाब आधीच मुंबई पोलिसांना नोंदविला आहे. पोलीस चौकशीला बोलावत आहेत त्यावेळी ती सहकार्य करीत आहे. बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही. यामुळेच तिने बिहारमध्ये दाखल झालेला एफआयर मुंबईला वर्ग करावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.
Edited by Sanjay Jadhav

