राम मंदिराच्या भूमिपूजनाला अडवानी, जोशींची असेल फक्त 'व्हर्च्युअल' उपस्थिती - l k advani and murjli manohar joshi will attend ram madir bhoomi pujan ceremony via video conferencing | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिराच्या भूमिपूजनाला अडवानी, जोशींची असेल फक्त 'व्हर्च्युअल' उपस्थिती

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. मात्र, राम मंदिराचे भूमिपूजन होण्याआधीच हा कार्यक्रम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  ५ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना पाठविण्यात आलेले नव्हते. यामुळे मोठा गदारोळ उडाला होता. आता हे दोघे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगून वादावर पडदा टाकण्यात आला आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. याचबरोबर भाजपमध्येही याबद्दल नाराजीचा सूर होता. अखेर अडवानी आणि जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावतील, असे सांगण्यात आले आहे. अडवानी आणि जोशी यांची अशा प्रकारे व्हर्च्युअल उपस्थिती कार्यक्रमाला असेल. 

राम मंदिर बांधण्यासाठी 1990 मध्ये सुरू झालेल्या चळवळीचा अडवानी हे चेहरा होते. ही चळवळ नंतर देशभरात पसरली. अखेर अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. बाबरी मशिद पाडण्याआधी अडवानी, जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. यामुळे जमाव हिंसक होऊन त्यांनी बाबरी मशिद पाडली, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे मंदिर निर्माण ट्रस्टने दोन तारखा पाठविल्या होत्या. यातील ५ ऑगस्ट ही तारीख पंतप्रधान कार्यालयाने अंतिम केली आहे. या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराची पायाभरणी होईल. मोदी हे अयोध्येत सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत असतील. मंदिराच्या बांधकामाच्या तयारीचे काम काही दिवसांसाठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबविण्यात आले होते. आता ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल. 

ट्रस्टची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. यातून दोन तारख्या ठरविण्यात आल्या. मंदिराच्या पायाभरणीसाठी माती परीक्षण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. लार्सन टुब्रो कंपनी हे काम करीत आहे. जमिनीखाली ६० मीटर खोलीवरील मातीची क्षमता तपासून मंदिराच्या पायाभरणीचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिरासाठी संगमरवराचे काम सोमपुरा मार्बल ब्रिक्स कंपनीला देण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख