सवदी म्हणाले....खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरेंकडून सीमा प्रश्नाचा आधार - Karnataka Deputy CM Laxman Savdi Targets Uddhav Thackeray Again | Politics Marathi News - Sarkarnama

सवदी म्हणाले....खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरेंकडून सीमा प्रश्नाचा आधार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमाप्रश्नावर मनमानी वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी मंगळूर येथे बोलताना बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याची दर्पोक्ती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपली खुर्ची टिकविण्यासाठी बेळगाव, कारवारचा प्रश्न उपस्थित करीत असल्याचा अजब दावा केला.

बंगळूर  : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमाप्रश्नावर मनमानी वक्तव्य करणे सुरूच ठेवले आहे. शनिवारी मंगळूर येथे बोलताना बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याची दर्पोक्ती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपली खुर्ची टिकविण्यासाठी बेळगाव, कारवारचा प्रश्न उपस्थित करीत असल्याचा अजब दावा केला.

सवदी यांनी असा आरोप केला की, महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीत भांडणे सुरू आहेत आणि म्हणूनच लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ठाकरे यांनी सीमाप्रश्नावर वक्तव्य करून बेळगाव, कारवार आणि निपाणी हे भाग महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. आम्ही आधीच बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित केले आहे. आम्ही तेथे दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन घेत आहोत. या सर्व गोष्टींची जाणीव असूनही ते केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी अशी विधाने करीत आहेत. 

बेळगावात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणूनच ते महाराष्ट्राचे असल्याचा त्यांचा दावा असेल तर, कर्नाटकातील उत्तर व किनारपट्टी प्रदेशातील रहिवासी मोठ्या संख्येने मुंबईत असल्याने मुंबई कर्नाटकात असावी, असा दावा केला तर कुठे चुकले, असा त्यांनी प्रश्न केला. बेळगावच्या सीमावादावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी यापूर्वीही मुक्ताफळे उधळली आहेत मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी अजब मागणी त्यांनी केली आहे. तर एका मंत्र्याने महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याचे वक्तव्य केले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  बेळगाव महाराष्ट्रात घेणारच, अशी गर्जना २७ तारखेला केली. तसेच सीमावादाचा प्रश्न संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणीही केली. त्यावर बोलातना सवदी यांनी हे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की,  पुर्वी कर्नाटकात असलेला मुंबई हा प्रांत भाषावार प्रांतरचना झाल्यावर तो महाराष्ट्रात गेला. तर बेळगाव कर्नाटकाला मिळाले. मराठी भाषिकांच्या मागणीनुसार मुंबई भागातील कन्नड नागरिकांवरही आपला हक्क आहे. त्यामुळे वारंवार बेळगाव, निपाणीची मागणी करू नये. बेळगाव घेऊन कर्नाटकला मुंबई द्या, अशी भूमिका सवदी यांनी मांडले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख