दिग्विजयसिंह अन् कमलनाथ काही काळ विसरले शिवराजसिंह चौहानांसोबतचे वैर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, राज्याची धुरा आता इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.
kamal nath and digvijay singh wish speedy recovery to shivraj singh chouhan
kamal nath and digvijay singh wish speedy recovery to shivraj singh chouhan

भोपाळ :  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहेत. याबाबत चौहान यांनी स्वत: टि्वट करून राज्यातील जनतेला ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस नेते कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांनी वैर विसरून चौहान यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. याचवेळी सोशल डिस्टन्सिंगच्या मुद्द्यावरुन दिग्विजयसिंह यांनी चौहान यांना चिमटाही काढला आहे. 

शिवराजसिंह चौहान यांनी आज सकाळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवर दिली. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या प्रिय, प्रदेशवासियांनो, मला कोविड-१९ ची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे मी कोरोनाची तपासणी केली. माझा कोरोना अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि होम क्वारंटाइन व्हावे. 

शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, मी सध्या कोरोनाच्या सर्व उपाययोजना करीत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, छोटीशी चूकही तुमच्या जिवावर संकट म्हणून येऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मला भेटत होते. त्यावेळी मी कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. परंतु, कोरोनाच्या समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना मदत करणे हे माझे कर्तव्य होते. माझ्या संपर्कातील सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. 

कोरोनाला घाबरू नका. वेळेवर उपचार घ्या. मी २५ मार्चपासून दररोज सांयकाळी कोरोनाबाबत बैठक घेत होतो. आता ही बैठक व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. माझ्या गैरहजरीमध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, मंत्री भूपेंद्र सिंह,  विश्वास सारंग , डॉ. प्रभू राम चौधरी हे बैठक घेतील. मी क्वारंटाइन काळात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्व प्रयत्न करत राहीन. आपण सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करीत कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करा, असे चौहान यांनी म्हटले आहे. 

राज्यातील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. त्याचवेळी या सत्तापालटात कमलनाथ यांचे मुख्यमंत्रिपद गेले होते. याचबरोबर दिग्विजयसिंह आणि चौहान यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. मात्र, चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच दोन्ही नेत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. 

कमलनाथ यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत आहे. 

शिवराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकून दु:ख वाटले. ईश्वर तुम्हाला लवकर बरे करो, असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केला म्हणून माझ्यावर भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तुमच्या बाबतीत ते असे काही करणार नाहीत, अशी आशा मला आहे, असा चिमटाही दिग्विजयसिंह यांनी काढला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com