अमेरिका "युनायटेड' - ज्यो बायडेन - कमला हॅरिस पर्वाला प्रारंभ

जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यु.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि 'अमेरिकेचा आत्मा' परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे आश्‍वासन दिले.
Joe Biden - Kamala Harris
Joe Biden - Kamala Harris

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यु.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि 'अमेरिकेचा आत्मा' परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उपाध्यक्षपद स्वीकारत अमेरिकेच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात केली.

दोन आठवड्यांपूर्वीच हिंसाचाराचा साक्षीदार झालेल्या 'कॅपिटॉल'मध्येच बायडेन यांच्या शपथविधीमुळे शांततेच्या नव्या पर्वाची आशा अमेरिकी नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी दिमाखदार पद्धतीने झाला. हॅरिस या पहिल्या महाला उपाध्यक्ष झाल्या आहेत. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ अमेरिकी कॉंग्रेसच्याच सदस्यांना हजर राहण्याची परवानगी होती. दरवेळी उपस्थित राहणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व व्यासपीठासमोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या अमेरिकेच्या दोन लाख राष्ट्रध्वजांनी केले. 

खुल्या मनाने पराभव मान्य करण्यास अखेरपर्यंत नकार दिलेले डोनाल्ड ट्रम्प हे शपथविधीच्या काही तास आधीच 'व्हाईट हाऊस'मधून फ्लोरिडाला रवाना झाले. या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. बराक ओबामा, जॉर्ज डब्लू बुश आणि बिल क्‍लिंटन हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष मात्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्सही शपथविधीला हजर होते.

सिनेटर ऍमी क्‍लोबुचर यांनी सूत्रसंचालन केले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सिनेटर रॉय ब्लंट यांनी अधिकृतपणे कार्यक्रम सुरू झाल्याची घोषणा केली. बायडेन यांचे जुने मित्र व मार्गदर्शक असलेले धर्मगुरू लिओ ओ डोनोवन यांनी प्रार्थना संदेश म्हटला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com