प्रवाशांसाठी खूषखबर; आंतरराष्ट्रीय विमानसेवाही होणार सुरू

देशांतर्गत विमानसेवा टप्प्याटप्प्याने 25 मेपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे.
international flights will start before august said hardeep singh puri
international flights will start before august said hardeep singh puri

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत तसेच, आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. सरकारने लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यास सुरूवात केली असून, आता देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा ऑगस्ट महिन्यापूर्वी सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. 

पुरी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. ते म्हणाले की, ऑगस्ट महिन्याआधी बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात 31 मेपर्यंत असलेले लॉकडाउन आणि 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करणे यात कोणताही विरोधाभास नाही. 

संसर्ग न झालेल्या प्रवाशाचे विलगीकरण करण्याची गरजच काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वंदे भारत मोहिमेविषयी बोलताना ते म्हणाले की, सरकारने या मोहिमेअंतर्गत पहिल्या 25 दिवसांत आतापर्यंत 50 हजार नागरिकांनी विशेष विमानांद्वारे परत आणले आहे.  

याचबरोबर देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून नुकतीच नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकारने विमान कंपन्यांशी आधीच चर्चा सुरू केली होती. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. मात्र, अनेक राज्यांनी विरोध केल्याने सरकारला हा प्रस्ताव स्थगित करावा लागला होता. आता सरकारने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले होते की, देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केवळ केंद्र सरकार घेऊ शकत नाही. लॉकडाउन उठवल्यानंतर विमानांचे उड्डाण करण्यास संबंधित राज्यांनी त्यांच्या विमानतळांवरून परवानगी द्यायला हवी. यास संघराज्य रचनेतील सहकार्याप्रमाणेच राज्यांचे सहकार्य मिळायला हवे. 

देशातील लॉकडाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरूवातीला २४ मार्चपासून २१ दिवसांसाठी जाहीर केले. त्यानंतर ते ३ मेपर्यंत आणि पुन्हा १७ मेपर्यंत वाढविण्यात आले. आता हे लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारने लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. सध्या सरकार परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीच्या विशेष विमानांना परवानगी देत आहे. वंदे भारत या मोहिमेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात येत आहे. विमानसेवा सुमारे दोन महिने बंद असल्याने विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. 

देशांतर्गत विमानसेवेसाठी अशी आहे नियमावली 

- दोन तासांहून कमी कालावधीच्या प्रवासासाठी विमानात केटरींगची सुविधा नाही 
- काही प्रकारचे स्नॅक्स प्रवाशांना देता येतील 
- केवळ निरोगी व्यक्तींनाच प्रवास करता येईल 
- केबिनमधील बॅगेजला परवानगी नाही 
- केवळ वेब-चेक इनची परवानगी 
- ध्रूमपान आणि प्रार्थनागृहासारख्या एकत्रित ठिकाणांचा वापर करता येणार नाही 
- आरोग्यसेतू अॅप मोबाईलवर असणे बंधनकारक 
- मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणे गरजेचे 
- प्रवाशांनी कोरोनाशी निगडित माहिती जाहीर करावी लागेल 
- संशयित रुग्णांसाठी मागील बाजूस वेगळ्या सीट 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com