indian government may be exclude huawei from 5g trials in country | Sarkarnama

टिकटॉकवरील बंदीनंतर आता बड्या चिनी कंपनीचा नंबर ?

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 30 जून 2020

भारत आणि चीनमधील संघर्षानंतर केंद्र सरकारने चिनी अॅप्सना दणका दिला आहे. सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर आता इतर चिनी कंपन्यांकडे मोर्चा वळविला आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. आता आगामी 5  जी मोबाईल तंत्रज्ञानासाठीच्या प्रस्तावित चाचण्यांमधून हुवेई या बड्या चिनी कंपनीची दावेदारी रद्द करण्याच्या हालचालीही केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या उच्चस्तरीय मंत्री बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह विदेशमंत्री एस. जयशंकर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल या वरिष्ठ मंत्र्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी टिक टाॅकसह 59 चिनी मोबाईल ॲप्सवर घातलेल्या बंदीचा आढावा घेतला. लडाख आणि गल्वानमध्ये चीनने केलेल्या कुरापतीनंतर भारताने आता आर्थिक क्षेत्रात शेजारी देशाचे नाक दाबण्याचे ठरविल्याचे धोरण स्वीकारले आहे. 

अमेरिका,सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांनी यापूर्वीच 5G चाचण्यांमधून हुवेईला हाकलले आहे. अमेरिकेने मे 2021 पर्यंत या कंपनीच्या उत्पादनांवर सुरक्षिततेच्या मुद्द्यावरूनच् बंदी घातली आहे. भारताने 5 - जी तंत्रज्ञानाच्या लिलावाची प्रक्रिया सध्या स्थगित केली आहे. हुवेईच्या संस्थापकाचे चीनच्या सैन्याबरोबर संबंध आहेत, हेही कारण भारताच्या नाराजीमागे असल्याचे सांगितले जाते. 

आजच्या बैठकीत 5G चाचण्यांबाबत चर्चा झाली. हुवेई ही कंपनी या चाचण्यांमधील प्रमुख दावेदार आहे. भारताने मागील वर्षी या कंपनीला आधी परवानगी दिली. मात्र, प्रसाद यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर चीनने, '' हुवेईला बंदी घालाल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील'' , असा इशारा ऑगस्ट 2019 मध्येच भारताला दिला होता. सीमेवरील ताजी परिस्थिती, 20 भारतीय जवानांचे हौतात्म्य आणि त्यानंतर वाढलेल्या तणावात देशातील चीन विरोधातील जनभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने आता हुवेईबाबत कठोर धोरण थेटपणे अमलात आणण्याची मानसिकता केल्याचे निरीक्षण सूत्रांनी नोंदवले. 

केंद्र सरकारने काल टिकटॉक, यूसी ब्राउजरसह 59 चिनी मोबाईल ऍप्लिकेशन्सवर बंदी घातली. त्यामागेही या अॅप'आडून चाललेल्या संशयास्पद कारवायांमुळे देशाची एकता आणि अखंडता तसेच सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना धोका आहे, हे कारण सांगण्यात आले होते. भारताच्या 5 जी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुवेई  बाबतदेखील इतर देशांचे तेच आक्षेप आहेत. 

59 चिनी अॅप्सना देशात प्रतिबंध करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप्स उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. हा निर्णय म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
-  प्रकाश जावड़ेकर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख