चिनी सैन्याच्या रात्रीच्या हालचालींवर नजर ठेवणार हवाई गस्त

भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्हे असून, मागील अनुभव लक्षात घेता या भागात हवाई दलाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
indian air force carrying out night time operations in eastern ladakh
indian air force carrying out night time operations in eastern ladakh

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गल्वान खोऱ्यातून चीनने अखेर आपले लष्कर मागे घेण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्यानुसार चीनने कार्यवाही सुरू केली आहे. मागील अनुभव लक्षात घेता भारत सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून, चीनच्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हवाई दलाने पूर्व लडाखमध्ये रात्रीची हवाई गस्त सुरू केली आहे. गल्वान खोऱ्यात 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने मिग-29 आणि सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांच्या साहाय्याने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी रात्रीची हवाई गस्त घालण्यात येत आहे. यात चिनूक हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात हवाई दलाकडून हवाई गस्त घालण्यात येत आहे. 

याविषयी बोलताना हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन ए. राठी म्हणाले की, शत्रू सैन्याकडून समोरील सैन्याला धक्का देण्यासाठी रात्री कारवाया केल्या जातात. यावर नजर ठेवण्यासाठी रात्रीची हवाई गस्त सुरू करण्यात आली आहे. हवाई गस्तीवेळी आधुनिक उपकरणांचा वापर करुन शत्रूच्या हालचाली शोधणे शक्य होते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट 14 येथील तंबू आणि इतर साहित्य चीनने हलविण्यास सुरूवात केली आहे. याचबरोबर गल्वान आणि गोग्रा हॉट स्प्रिंग्ज या भागातून चीनच्या सैन्याचे ट्रक साहित्य घेऊन माघारी जात असल्याचे दिसत आहे. कोअर कमांडर पातळीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या बैठकीत चीनच्या सैन्याने गल्वान खोऱ्यातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पँगाँग त्सो तसेच, फिंगर 4 आणि फिंगर 6 भागात चीनने जादा सैन्य तैनात केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. गल्वान खोऱ्यातील टेहळणी चौकी हटविण्यास चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांनी सांगितल्यानंतर 15 जूनला संघर्ष झाला होता. 

भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जूनला रात्री चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला नव्हता. 

भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना घडली होती. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले आहेत. या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारतीय लष्कराने चीनच्या बाजूचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला असून, त्यांची संख्या आताच सांगणे शक्य होणार नाही, असे म्हटले होते. 

मागील काही काळापासून पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य आमनेसामने आले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांनी संघर्ष टाळून माघार घेतल्याचा दावा नुकताच केला होता. आता ही घटना घडल्याने त्यांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पूर्व लडाखमध्ये पँगाँग त्सो, गल्वान खोरे, डेमचॉक आणि दौलत बेग ओल्डी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान याआधी संघर्ष झाला होता. मात्र, यात कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com