देशात कोरोनाने केला कहर; चोवीस तासांत विक्रमी रुग्णसंख्या - india sees record corona cases in last 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

देशात कोरोनाने केला कहर; चोवीस तासांत विक्रमी रुग्णसंख्या

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, सरकारसमोरील चिंता आणखी वाढली आहे. मागील चोवीस तासांत देशात विक्रमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येमध्ये रोज विक्रमी वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वाधिक ६ हजार ६५४ नवीन रुग्ण आढळले असून १३७ लोकांनी प्राण गमावले आहेत. 

दुसरीकडे आज संध्याकाळी चारपर्यंत आलेल्या सुधारित आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात आणखी २८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यात राजधानी दिल्लीतील सर्वाधिक २३ जणांचा समावेश आहे दिल्ली सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही दिल्लीतील मृतांचा आकडा वाढला आहे. देशात १५ मेपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर ९ टक्क्यांवर येईल हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील विशेष गटाचा अंदाज प्रत्यक्षात उलटाच ठरला असून १५ मे नंतरच देशात दररोज नवे कोरोनाग्रस्त आणि मृत्युमुखी पडणारे यांच्या संख्येत भयावह वाढ झाल्याचे चित्र आहे. 

भीती खरी ठरली 

‘एम्स’चे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, जून आणि जुलैमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक होईल. त्यांची भीती खरी ठरण्याचे संकेत मे महिन्याच्या उत्तरार्धातच मिळू लागले आहेत. मात्र बरे झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढत वाढत ४५ हजार २९० पर्यंत पोहोचला आहे, ही यातील दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

 

रूग्ण डॉक्टरांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन वापरा 

भारतात कोरोनाचा गंभीर धोका असलेले रूग्ण आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या गोळ्यांचा वापर करावा असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. या संस्थेच्या कृती गटाने जारी केलेल्या ताज्या दिशा निर्देशांत या सूचनांचा समावेश आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून या गोळ्यांची सर्वत्र चर्चा होती. अमेरिकेच्या अन्न आणि प्रशासन विभागाने या गोळ्यांच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले होते. भारतात या गोळ्यांचे जगाच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होते हे लक्षात घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या गोळ्या भारताने अमेरिकेला द्याव्यात, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकीच दिली होती. त्यानंतर भारताने तात्काळ निर्यातीवरील निर्बंध मागे घेऊन अमेरिकेसह सुमारे ६० देशांना या गोळ्यांचा पुरवठा केला होता. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरते असे भारताने अधिकृतरीत्या म्हटलेले नाही. 

लहान मुलांना औषध नको 

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना या औषधाच्या गोळ्या उपचार म्हणून द्याव्यात असे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. प्रयोगशाळांकडून ज्या संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांचा डोस द्यावा. पंधरा वर्षांच्या आतील मुलांना मात्र या गोळ्या देऊ नयेत असे या निर्देशांत नमूद करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख