भारत धर्मनिरपेक्ष आहे, पण आज लोकशाहीचा पराभव झाला, ओवैसींची मोदींवर टीका  - India is secular, but democracy has been defeated today, Owaisi criticizes Modi | Politics Marathi News - Sarkarnama

भारत धर्मनिरपेक्ष आहे, पण आज लोकशाहीचा पराभव झाला, ओवैसींची मोदींवर टीका 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृतीचे नाते सांगितले.

नवी दिल्ली : "" भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. आज दिवस म्हणजे लोकशाहीचा पराभव असल्याची टीका "एआयएमआयएम'चे प्रमुख असुद्दिन ओवैसी यांनी केली आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच रामजन्मभूमीमुक्तीसाठीचे आंदोलन झाले. अयोध्येत राममंदिर उभे राहत असल्याने कोट्यवधी रामभक्तांसाठी हा आजचा आनंदाचा दिवस आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृतीचे नाते सांगितले. भारत आज सुवर्णअध्याय लिहित आहे. आज संपूर्ण भारत राममय आहे. देश रोमांचित, भावूक आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपली आहे. आपल्या जिवंतपणी हे स्वप्न साकार होईल, असे कोट्यवधी लोकांना वाटत नव्हते. देशात स्वातंत्र्य आंदोलनासाठी संपूर्ण देश प्रयत्नशील होता. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून स्वातंत्र्यासाठीचा हुंकार निघत होता. त्यांच्या या लढ्याचे परिमार्जन 15 ऑगस्ट रोजी झाले. हा दिवस देशासाठी महत्त्वाचा ठरला. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच आजचा पाच ऑगस्ट हा दिवस संकल्प व त्याग यांचे प्रतिक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 

स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच कोट्यवधी लोकांनी रामजन्मभूमीसाठी सहभाग घेतला. या सर्व सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी देशवासियांच्या वतीने अभिवादन करतो. रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडला गेलेला प्रत्येक जण आज भावनाप्रधान झाला आहे. प्रभू राम आपल्या मनात मिसळून गेले आहेत. कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि ती भविष्यातही मिळत राहील, असे मोदी यांनी सांगितले. 

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उमा भारती यांच्यासह 175 मान्यवरांना निमंत्रण करण्यात आले होते. यामध्ये साधुसंताचाही समावेश होता. भूमिपूजनानंतर मोदी यांच्यासह प्रमुख वक्‍त्यांची भाषणेही झाली. देशभर आजच्या अयोध्येतील कार्यक्रमाचीच चर्चा होती. या कार्यक्रमानंतर ओवैसी यांनी आपल्या ट्‌विटर हॅंडलवर ट्‌विट करून मोदींना लक्ष्य केले आहे. 

ते म्हणाले, की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून गुप्ततेची शपथ घेतली आहे. असे असताना ते अयोध्येत जातात. राम मंदिराचे भूमिपूजन करतात.हे योग्य नाही. आज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीचा पराभव झालेला आहे. तसेच हिंदुत्व यशस्वी झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख