राम मंदिराच्या भूमिपूजनाला नियमानुसार अडवानीच नव्हे तर, मोदीही उपस्थित राहू शकत नाहीत... - if rules followed narendra modi will also not allowed for ram mandir bhoomi pujan | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिराच्या भूमिपूजनाला नियमानुसार अडवानीच नव्हे तर, मोदीही उपस्थित राहू शकत नाहीत...

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. मात्र, राम मंदिराचे भूमिपूजन होण्याआधीच हा कार्यक्रम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन आता गदारोळ सुरू झाला आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना पाठविण्यात आलेले नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 65 वर्षांवरील व्यक्ती धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत. याचे काटेकोर पालन करायचे झाल्यास मोदींनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी हे बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. अडवानी आणि जोशी यांनाच राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमातून डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यानुसार 65 वर्षांवरील व्यक्तीला कार्यक्रमाला आरोग्याच्या कारणास्तव उपस्थित राहता येत नाही. त्यांनी घरी बसूनच कार्यक्रमास सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. याचबरोबर गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुलांसाठीही हाच निकष आहे. 

अडवानी यांचे वय 92 तर जोशी यांचे वय 88 आहे. अयोध्येतील कार्यक्रमाला त्यांच्या वयाचा विचार करुन निमंत्रण देण्यात आलेले नाही. कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावयाचे झाल्यास पंतप्रधान मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. कारण मोदी यांचे वय 69 आहे. अयोध्येतील कार्यक्रमाला आधी सुरुवातीला 250 जण उपस्थित राहतील, असे नियोजन होते. आता ही संख्या 200 वर आणण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राम मंदिर बांधण्यासाठी 1990 मध्ये सुरू झालेल्या चळवळीचा अडवानी हे चेहरा होते. ही चळवळ नंतर देशभरात पसरली. अखेर अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. बाबरी मशिद पाडण्याआधी अडवानी, जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. यामुळे जमाव हिंसक होऊन त्यांनी बाबरी मशिद पाडली, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. 

Edited Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख