राजस्थानमधील 'नंबरगेम' नेमका आहे तरी काय...कोण तरेल, कोण बुडेल?

राजस्थानमधील राजकीय वादळ अद्याप शमले नसले नसून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचवेळी सचिन पायलट यांनी 30 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
how is the rajasthan assembly numbers game is changing rapidly
how is the rajasthan assembly numbers game is changing rapidly

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. यावरुन राज्यात वेगवेगळी सत्तासमीकरणे अस्तित्वात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, एकंदरीत विधानसभेतील संख्याबळ आणि सध्या होत असलेले संख्याबळाचे दावे पाहता राज्यातील काँग्रेस सरकार पडण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे. 

राजस्थानच्या विधानसभेचे एकूण संख्याबळ 200 आहे. यात काँग्रेस पक्षाचे 107 आमदार आहेत. काँग्रेस सरकारला 13 अपक्षांचा पाठिंबा आहे. यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन आमदार, भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आमदार आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा समावेश आहे. यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 122 आहे. दरम्यान, तीन अपक्षांनी आज सकाळीच सकाळीच सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने हे संख्याबळ 119 वर आले आहे. विधानसभेत भाजपचे 72 आमदार आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे तीन आमदार आणि तीन अपक्षांचा भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ 78 वर पोचते. 

आता गेहलोत यांनी त्यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचवेळी सचिन पायलट यांनी त्यांच्यासोबत 30 आमदार असल्याचा दावा केला आहे. समजा सचिन पायलट यांच्याकडे 30 आमदार असतील आणि त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्यास चित्र वेगळे दिसेल. पायलट यांनी समर्थक आमदारासह पाठिंबा काढल्यास बहुमतासाठी लागणारे संख्याबळ कमी होईल. याचबरोबर तीन अपक्ष आमदारांचाही विचार करावा लागेल. यामुळे बहुमतासाठी 84 आमदार लागतील. एवढे गृहित धरूनही भाजपला बहुमत मिळवणे शक्य होणार नाही कारण पक्षाचे 72 आमदार आहेत. 

राजस्थानमधील घडामोडींविषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया म्हणाले की, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. हे सरकार सत्तेतून जायला हवे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. राज्यात निर्माण होणारी परिस्थिती आणि केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार पावले उचलली जातील. काँग्रेसमध्ये कायम तरुण नेत्यांना बाजूला केले जाते अथवा दुर्लक्ष केले जाते. काँग्रेसला बळ देण्यासाठी पाच वर्षे पायलट यांनी काम केले. त्यांना पक्षाने डावलले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आज सुमारे 90 आमदार हजर होते. ही बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर पडताना पक्षाचे आमदार विजयाची खूण करीत होते. त्यामुळे गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करुन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र आहे. या वेळी पक्षाने पाठविलेले केंद्रीय निरीक्षक रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हेही उपस्थित होते. 

या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये राज्यातील लोकशाहीला धक्का पोचवून भाजप आठ कोटी जनतेचा अपमान करीत आहे. हे कदापी स्वीकारार्ह नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील. राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकमताने पाठिंबा आहे.  राज्यातील काँग्रेसचे सरकार आणि पक्षाच्या विरोधात कारवाया करणारे पक्ष पदाधिकारी अथवा आमदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

सचिन पायलट यांच्या निकटवर्ती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत यांनी दावा केल्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्र्यांची परसबाग हे काही संख्याबळ सिद्ध करण्याचे ठिकाण नाही. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी शिरगणती का केल नाही? आमदारांना राज्यपालांकडे नेण्याऐवजी हॉटेलमध्ये का नेले? 
दरम्यान, काल रात्री सचिन पायलट यांनी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. याचबरोबर आज होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीलाही पायलट उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com