मी प्रथम दिल्लीत आलो तेव्हा सुषमाजींची मदत आणि सल्ला घेत असे, नायडूंनी दिला आठवणींना उजाळा 

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा आज पहिला स्मृतीदिन.
मी प्रथम दिल्लीत आलो तेव्हा सुषमाजींची मदत आणि सल्ला घेत असे, नायडूंनी दिला आठवणींना उजाळा 

नवी दिल्ली : "" सुषमाजी, आमच्या कुटुंबातील एक सदस्या होत्या. ज्यावेळी मी प्रथमच नवी दिल्लीत आलो तेव्हा त्यांच्याकडे मदत आणि सल्ला घेण्यासाठी जात असे,'' असे सांगत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा आज पहिला स्मृतीदिन. भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत राजकीय नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. केवळ भाजपतच नव्हे तर सर्वच पक्षात त्यांना आदराचे स्थान होते. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र राजकारणापलिकडे वैयक्तित नाती जपली जातात.

स्वराज यांचे भाजपतच नव्हे तर कॉंग्रेस, शिवसेनाच काय समाजवादी, डाव्या पक्षातही शेकडोजण चाहते होते. आपल्या अमोघवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वराज या नेहमीच या ना त्या कारणाने आठवत जातात. त्यांचे देशाच्या कानाकोपऱ्यात जेथे जेथे भाषण असे तेथे मोठी गर्दी होत असे. त्यांचे भाषण म्हटले की लोकांची पावले सभामंडपाकडे आपोआपच वळत. 

भाजप आणि संघ परिवारातही त्यांना वरचे स्थान होते. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीरित्या भूषविली. स्वराज यांचे गेल्यावर्षी 6 ऑगस्टरोजी निधन झाले होते. त्यांच्या आजच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यापैकीच एक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. 

नायडू आणि स्वराज यांनी केंद्रात मंत्री आणि भाजपचे नेते म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. अशा स्वराज यांचे मोठेपण कथन करताना नायडू यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात, "" त्या मंत्री असताना सोशल मीडियावर मानवी स्वभाव, तत्परता आणि जबाबदारीने व्यक्त होत असत.अलिकडच्या काळात सर्वाधिक प्रसिद्ध परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाते. पक्षातील त्या माझ्या केवळ सहकारीच नव्हत्या तर कुटुंबातील एक सदस्य होत्या. कोणत्याही विनंती आणि प्रश्‍नावर तत्परतेने प्रतिसाद देत. एक व्यक्ती म्हणून त्या थोर होत्या. 

स्वराज यांनी माजी उपपंतप्रधान देवीलाल, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. भाजपची कोणतीही निवडणूक असो त्या स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरत असत. विरोधकांवर टीका करताना किंवा समाचार घेताना त्यांनी कधीही पातळी घसरू दिली नाही.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी असोत की प्रमोद महाजन यांच्या खांद्याखांद्याला खांदा लावून त्यांनी पक्षासाठी संपूर्ण देश पालथा घातला. देशातच नव्हे तर परदेशातही भारताची बाजू मांडताना ठसा उमठविला. अगदी सामान्य माणसाचे प्रश्‍न समजवून घेणे आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com