आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचा अतिरिक्त पगार  - Health workers in Bihar will get an extra salary's one month | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचा अतिरिक्त पगार 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 एप्रिल 2021

शाळा, महाविद्यालये १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पटना : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी विविध उपाय योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाईट कर्फ्यूपासून शाळा, महाविद्यालये १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर कोरोनविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे राज्यातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाईल, अशी घोषणाही नीतीश कुमार यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या घोषणेच्या बिहारच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी (ता. १८ एप्रिल) सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत बिहारमध्ये एकूण 1,00,604 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 2,77,667 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,700 असून रुग्णांचा रिकव्हरी रेट 85.67 टक्के आहे. 

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी महत्त्वाच्या उपाय योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्यास बंदी असेल. दफन, स्मशानभूमी आणि पूजासंदर्भात ती लागू होणार नाही. दफन आणि अंत्यसंस्कार करतेवेळी फक्त 25 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. लग्नात केवळ शंभर जण उपस्थित राहू शकतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

संपूर्ण बिहारमध्ये रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहतील. सायंकाळी सहा वाजता सर्व दुकाने, आस्थापने, फळे व भाजीपालाची दुकाने, मंडी, मांस व मासे विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये जेवण्यास बंदी असेल रात्री 9 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहणार आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि इतर शैक्षणिक संस्था 15 मेपर्यंत बंद राहतील. या काळात विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा होणार नाहीत. तसेच  15 मे पर्यंत सर्व सिनेमा हॉल, मॉल्स, क्लब, जिम, उद्याने आणि पूर्णपणे बंद असतील. तसेच, आमच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाईल, असे ही नीतीशकुमार यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या माजी मंत्री, विद्यमान आमदाराचा मृत्यू

पटना : बिहारमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असून बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) विद्यमान आमदार मेवालाल चौधरी यांचा सोमवारी (ता. १९ एप्रिल) पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांपूर्वी आमदार चौधरी यांचा कोरोनाचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला होता. पटना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तारापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे मेवालाल चौधरी यांना तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी पटनामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादम्यान सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

दरम्यान, विधानसभेच्या २०२० मधील निवडणुकीत मेवालाल चौधरी यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघातून जेडीयू तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजय मिळविलेल्या आमदार मेवालाल चौधरी यांची मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती केली होती. मुख्यमंत्र्यांनी चौधरी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाची धुरा सोपवली होती. मात्र, कलंकित नेत्याला राज्याचे शिक्षण मंत्री केल्याचा मुद्दा घेऊन विरोधकांनी चौधरी यांच्याविरोधात राज्यभर रान उठवले होते. त्यामुळे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना अवघ्या काही दिवसांतच मेवालाल चौधरी यांना पदावरून दूर करावे लागले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख