गुप्तेश्वर पांडे भाजपचेच वरिष्ठ नेते : अनिल देशमुखांचा टोला - Gupteshwar Pandey is a BJP Leader alleges Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

गुप्तेश्वर पांडे भाजपचेच वरिष्ठ नेते : अनिल देशमुखांचा टोला

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमीका घेणारे वादग्रस्त पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज बिहार सरकारने नुकताच मंजूर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत पांडे हे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे

गोंदिया : बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपाचेच वरिष्ठ नेते, असल्याचा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. बिहार विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष रचत असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमीका घेणारे वादग्रस्त पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज बिहार सरकारने नुकताच मंजूर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत पांडे हे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.  पांडे यांनी २०१४ मध्येही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यावेळीही त्यांना निवडणूक लढवायची होती. पण त्यावेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता.

पांडे राजकारणात जाणार असा अंदाज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांनी केलेल्या विविध विधानांवरुन वर्तविला जात आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पाटण्यात तक्रार दाखल करुन घेण्यात पांडे अग्रभागी होती. रियाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबाबत विधाने केल्यानंतर 'तिची लायकी नाही,' असे विधान करुन पांडे यांनी वाद ओढवून घेतला होता.  वास्तविक स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते. मात्र, बिहार सरकारने पांडे यांचा अर्ज तातडीने मंजूर करुन त्यांना तातडीने कार्यमुक्त केले.

याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, "सुशांतसिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच षडयंत्र सुरु आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्रर  पांडे यांच्या वक्तव्यावरून आधीपासूनच ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असल्याचे दिसून येत होते. आता त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीवरून ते सिद्ध झाले आहे. बिहार विधानसभेची निवडणूक पाहता महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपा रचत आहे,"

''दरम्यान, सुशांत असो, कंगना असो सगळे विषय बिहार निवडणूक झाल्या की संपतील. अभिनेत्री कंगना राणावत असो की बिहारचे डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे असोत त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे," असा आरोप कॉंग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टिवार यांनी नुकताच केला होता.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख