खलिस्तानशी संबंधित ट्वीटर खाती बंद करण्याची केंद्राची सूचना - Government Ask twitter to Close more than Thousand Twitter Accounts | Politics Marathi News - Sarkarnama

खलिस्तानशी संबंधित ट्वीटर खाती बंद करण्याची केंद्राची सूचना

वृत्तसंस्था
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आक्षेप घेत सुमारे एक हजाराहून अधिक ट्वीटर खाती बंद करावीत, अशी विनंती केंद्र सरकारने ट्वीटरला केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आक्षेप घेत सुमारे एक हजाराहून अधिक ट्वीटर खाती बंद करावीत, अशी विनंती केंद्र सरकारने ट्वीटरला केली आहे. या खात्यांपैकी सुमारे ११७८ ट्वीटर वापरकर्ते हे पाकिस्तानी आणि खलिस्तानी चळवळीशी संबंधित असल्याचा दावा सरकारने केला आहे. 'टुलकिट' प्रकरणानंतर आता सरकारने या मुद्द्यावर जोर लावायला सुरुवात केली आहे. 

स्विडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने गेल्या आठवड्यात टुलकिट बाबत ट्वीट करुन नंतर ते डिलीट केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या ट्वीटद्वारे तिने पसरवलेले डाॅक्युमेंट हे चुकीची माहिती पसरवणारे असून ते सरकारच्या विरोधात असून समाजाच्या विविध वर्गांमध्ये तेढ पसरविण्याच्या दृष्टीने ते पसरविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. 

या टुलकिटनुसार २६ जानेवारी किंवा त्यापूर्वी हॅशटॅगच्या माध्यमातून डिजिटल हल्ला करणे, २६ जानेवारी रोजी प्रत्यक्ष 'कृती', शेतकरी रॅलीत प्रत्यक्ष सहभाग घेणे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही भागात शेतकरी आंदोलकांनी आपल्या ट्रॅक्टरवर जे ध्वज फडकवले होते, त्यात खलिस्तानी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे छायाचित्र होते, असाही आक्षेप पोलिसांनी घेतला आहे. या चळवळीला खलिस्तानवाद्यांकडून मदत मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही खाती बंद करण्याची विनंती ट्वीटरला केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख