माजी केंद्रीय मंत्री बुटा सिंग यांचं निधन - Former Union minister Buta Singh passes away Congress | Politics Marathi News - Sarkarnama

माजी केंद्रीय मंत्री बुटा सिंग यांचं निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 जानेवारी 2021

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग (वय 86) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग (वय 86) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बुटा सिंग आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील मुस्तफापूर गावात  21 मार्च 1934 रोजी बुटा सिंग यांचा जन्म झाला होता. ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी बुटा सिंग हे एक होते. रेल्वे मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे त्यांनी भूषविली होती. बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. 
 
निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला : राहुल गांधी

सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

सरदार बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बुटा सिंग हे अनुभवी प्रशासक होते. दलित आणि गरीबांचा आवाज होते. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख वाटलं. बुटा सिंग यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना आहेत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख