मोदींचे नाव 16 वेळा आणि शेतकऱ्यांचा उल्लेख 13 ठिकाणी  : चिदंबरम - Former Finance Minister P. Chidambaram criticizes Union budget | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींचे नाव 16 वेळा आणि शेतकऱ्यांचा उल्लेख 13 ठिकाणी  : चिदंबरम

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

ही शेतकरी आणि सर्वसामान्यांची क्रूर थट्टा आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सडकून टीका केली. 

"जणू चीनने भारतीय भूभागावरील ताबा सोडून दिला आहे, अशा थाटात सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात संरक्षण क्षेत्राच्या तरतुदींचा उल्लेखही टाळला,' असा टोला चिदंबरम यांनी लगावला. तसेच, गेल्या वर्षीचे सीतारामन यांचे अडीच तासांचे अर्थसंकल्पीय भाषण या वर्षी दीड तासांवर आले. यातही पंतप्रधान मोदींचे नाव 16 वेळा घेण्यात आले आणि शेतकऱ्यांचा उल्लेख मात्र 13 ठिकाणी करण्यात आला,' अशा शब्दांत चिदंबरम यांनी अर्थमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. 

मोदी सरकारचा अर्थसंकल्प निव्वळ फसवणुकीचा असून पेट्रोल आणि डिझेलवरील अनुक्रमे अडीच आणि चार रुपयांचा अधिभार म्हणजे शेतकरी आणि सर्वसामान्यांची क्रूर थट्टा आहे, असा प्रहारही त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर केला आहे. 

मावळत्या आर्थिक वर्षात संरक्षण खात्यासाठी असलेली 3,43,822 कोटी रुपयांची तरतूद याही वर्षी कमी अधिक फरकाने तशीच म्हणजे 3,47,088 कोटी रुपये एवढीच आहे, याकडेही चिदंबरम यांनी लक्ष वेधले. आरोग्य खात्याच्या तरतुदीमध्ये 2,23,846 कोटी रुपयांची घसघशीत वाढ केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा म्हणजे हातचलाखी आहे.

प्रत्यक्षात यामधे लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपये आणि वित्त आयोगाचे अनुदान 49,214 कोटी रुपये यांचाही चलाखीने समावेश केला आहे. हे वगळता आरोग्य खात्याची तरतूद 2020-21 मधील 72,934 कोटी रुपयांएवढीच म्हणजे 79,602 कोटी रुपये (2021-22) आहे, अशी टिका चिदंबरम यांनी केली. 

9. 5 टक्के वित्तीय तुटीने सर्व मर्यादा पार केलीच आहे, शिवाय 2025-26 पर्यंत वित्तीय तूट साडेचार टक्‍क्‍यांवर आणण्याचे ठरविलेले उद्दीष्ट गुंतवणुकीवर विपरीत परिणाम करणारे असेल, असा इशाराही चिदंबरम यांनी दिला. 

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप करताना चिदंबरम यांनी, शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6 हजार रुपये मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची तरतूद 75 हजार कोटी रुपयांवरून 65 हजार कोटी रुपये करण्यात आल्याचाही दावा केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख