former dmk leader duraisamy joins bhartiya janata party | Sarkarnama

कोरोनाच्या संकटातही भाजपने पाडले या पक्षाला खिंडार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

भारतीय जनता पक्षाचे दक्षिणेत प्रवेश करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पक्षाला फारसे यश अद्याप मिळालेले नाही. आता तमिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाच्या माजी उपसरचिटणीसाला फोडून स्वतःकडे ओढण्याची खेळी भाजपने खेळली आहे. या खेळीला कितपत यश मिळते हे येणारा काळ ठरवेल. 

चेन्नई : तमिळनाडूनत द्रमुकच्या सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्ही.पी.दुराईसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपने तमिळनाडूत आपली ताकद वाढविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. 

मी भाजपची धोरणे स्वीकारली असून, केवळ भाजपच भारताचे संरक्षण करु शकते, असे दुराईसामी यांनी म्हटले आहे. पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या विनंतीवरुन द्रमुकमध्ये मी प्रवेश केला होता. द्रमुकच्या सध्याच्या नेतृत्वाला प्राथमिक सदस्यत्वावरुन दूर करण्याची विनंती मी केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

म्हणून मी द्रमुक सोडली..

द्रमुक पक्ष स्थापना करण्यावेळी असलेल्या मूळ विचारधारेपासून दूर गेला आहे. यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप हा चांगला हेतू असलेला पक्ष असून, या पक्षात मी प्रवेश करीत आहे, असे दुराईसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले. 

भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट 

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांची काही दिवसांपूर्वी दुराईसामी यांनी भेट घेतली होती. दुराईसामी यांची काल (ता.21) पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यावर बोलताना दुराईसामी काल म्हणाले होते की, ही बातमी माझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. माझ्या जागी राज्यसभा खासदार अंधियूर सेल्वराज यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मी शुभेच्छा देतो. ते काही माझे शत्रू नाहीत.  
द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी दुराईसामी यांनी पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही कारवाई करण्यामागील नेमके कारण त्यांनी स्पष्ट केले नव्हते. 

कोण आहेत दुराईसामी 

दुराईसामी हे तमिळनाडू विधानसभेचे दोन वेळा उपासभापती होते. ते 1989 ते 1991 आणि 2006 ते 2011 या काळात उपसभापती होते. भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वतुर्ळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. द्रमुक आणि भाजपमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याने या घडामोडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

याआधीही असाच प्रकार 

याआधी माजी केंद्रीय मंत्री डी.नेपोलियन यांनी डिसेंबर 2014 मध्ये द्रमुकला सोडचिठ्ठी दिली होती. नंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल अभिनेते राधारवी यांची द्रमुकमधून गेल्या वर्षी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनीही अण्णाद्रमुकमध्ये काही काळ प्रवेश करुन नंतर भाजपचा रस्ता धरला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख