शशी थरुर, राजदीप सरदेसाईंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा - FIR About Sedition registered against Shashi Tharoor, Rajdeep Sardesai | Politics Marathi News - Sarkarnama

शशी थरुर, राजदीप सरदेसाईंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

काँग्रेसचे खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह आणखी सहा पत्रकारांच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह आणखी सहा पत्रकारांच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे विपर्यास्त वार्तांकन करणे व समाजमाध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित करुन भावना भडकवण्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. 

धर्म, जात, पंथ यांच्या आधारे समाजात दुही माजवणे, राष्ट्रीय एकात्मतेला धक्का लावणारे कृत्य करणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने काही कृत्य करणे, समाजात शत्रूत्व निर्माण करणे, यासाठी कट करणे असे विविध आरोप या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत. प्रसासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. त्याबाबत चुकीचे वार्तांकन व चुकीचा संदेश जाईल, असे ट्वीट केल्याची तक्रार अर्पित मिश्रा या समाजसेवकाने नाॅएडा पोलिसांकडे दिली आहे. 

या सर्वांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अजामीनपात्र असून मध्य प्रदेशातील भोपाळ येथेही या सर्वांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजदीप सरदेसाईंच्या व्यतिरिक्त मृणाल पांडे, विनोद जोस, जफर आगा, परेश नाथ आणि अनंत नाथ अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य पत्रकारांची नांवे आहेत. दिल्ली पोलिसांनी या आधी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि गुन्हेगारीकडून सामाजिक कार्यकर्ता बनलेल्या लखा सिधाना यांच्या विरोधात लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडनंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली होती. या दरम्यान, काही शेतकरी आंदोलक बॅरिकेड तोडून प्रतिबंध असलेल्या जागेकडे गेले. त्यानंतर हे आंदोलक लाल किल्ल्यातही शिरले. यावेळी पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान करण्यात आले. या वेळी उसळलेल्या हिंसाचारानंतर राजधानीतले वातावरण तणावपूर्ण बनले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख