प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाला गळती

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी टिकैत व योगेंद्र यादव यांच्यासह सरकारशी चर्चेत सहभागी असलेल्या अनेक शेतकरी नेत्यांविरूध्द नांगलोई व विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले असून २०० जणांना अटक केली आहे. यातील काही गुन्हे दरोडा घालण्याच्या कलमाखालीही दाखल केले गेले आहेत.
Farmers Agitation in New Delhi
Farmers Agitation in New Delhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोधासाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्‍टर परेडला अत्यंत हिंसक आंदोलन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संयुक्त किसान संघर्ष समितीच्या भारतीय किसान यूनियन (भानु) व शेतकरी कामगार संघटना (व्ही एम सिंग गट) या दोन संघटनांनी या आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय  जाहीर केला. या संघटनांनी हिंसाचारासाठी राकेश टिकैत यांच्यासह काही शेतकरी नेत्यांना जबाबदार धरले आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी टिकैत व योगेंद्र यादव यांच्यासह सरकारशी चर्चेत सहभागी असलेल्या अनेक शेतकरी नेत्यांविरूध्द नांगलोई व विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले असून २०० जणांना अटक केली आहे. यातील काही गुन्हे दरोडा घालण्याच्या कलमाखालीही दाखल केले गेले आहेत.

टीकरी सीमेपासून लाल किल्ल्यापर्यंत विविध भागांत धुडगूस घालणाऱ्यांच्या हल्ल्यात किमान ३०० पोलिस जखमी झाले आहेत त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या संयुक्त समन्वय समितीने काढलेल्या निवेदनात "प्रजासत्ताक दिनाचा हिंसाचार म्हणजे शेतकऱ्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाविरूध्द सूत्रबध्द पध्दतीने रचलेले कारस्थान आहे कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार पुरते हादरले आहे,'' असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कालच्या हिंसाचारातून आम्ही बरेच काही शिकलो असे संघर्ष समितीचे जसबीरसिंग यांनी सूचकपणे सांगितले.

भारतीय किसान युनियनचे भानुप्रताप सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगतले की कालच्या हिंसाचाराने आपण व्यथित असून नोएडा व गाजीपूर सीमांवरील आंदोलनांतून आपण माघार घेत आहोत. शेतकऱ्यांना बळी देण्यासाठी या आंदोलनाची सुवात झालेली नव्हती. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत आहोत. या आंदोलनात आपण यापुढे सहभागी होऊ शकत नाही कारण याची दिशाच वेगळी असल्याचे आपल्याला काल जाणवले. आंदोलनाच्या नावाखाली आम्ही देशाला बदनाम करू इच्छित नाही, असेही ते म्हणाले. 

शेतकरी मजूर संघटनेचे व्ही एम सिंग म्हणाले की टिकैत यांच्यासारख्यांबरोबर आम्ही या आंदोलनात यापुढे सहभागी होऊ शकत नाही. टिकैत यांनी शेतकऱ्यांना विशेषतः तरूणांना लाठ्या काठ्या घेऊन जाण्यास सांगून चिथावणी दिली. या आंदोलनाला आम्ही शुभेच्छा देतो. टिकैत ज्या भागातून येतात तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांनी एकाही बैठकीत पुढे केल्या नाहीत. तिन्ही कायद्यांमुळे या शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे. टिकैत यांना त्यांची नव्हे तर कालच्या ट्रॅक्‍टर परेडबाबत इतर भलत्याच बाबींची चिंता लागली होती. निर्धारित मार्गांवरून न जाता दिल्लीत घुसलेल्या शेतकऱ्यांना संयुक्त संघर्ष समितीच्या एकाही नेत्याने वेळीच मागे येण्याचे आवाहन केले नाही, असाही आरोप त्यानी केला. त्याच वेळी सरकारनेही शेतकरी लाल किल्ल्याकडे जात असताना व फुटीरतावाद्यांनी लाल किल्यावर वेगळा झेंडा फडकवण्याची चिथावणी दिल्याचे समजल्यानंतरही या झुंडीला रोखण्यासाठी काहीही केले नाही व सरकार त्यावेळी काय करत होते असाही सवाल त्यांनी विचारला.

'आंदोलन चालूच राहील'
शेतकरी संघर्ष समन्वय समितीने कालच्या हिंसाचाराबद्दल काल बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व दिल्लीच्या सीमांवरील शांततापूर्ण आंदोलन कृषी कायदे रद्द होईपर्यंत चालू राहील असे घोषित केले. बलवीरसिंग राजेवाल, दर्शन पाल आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात केंद्र सराकरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

राकेश टिकैत यांनी, हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. संघर्ष समितीच्या निवेदनात म्हटले आहे की "दिल्लीच्या सीमांवर गेले सुमारे दोन महिने चाललेल्या शांततापूर्ण आंदोलनामुळे हे सरकार मुळापासून हादरले आहे. त्यामुळे या शांततापूर्ण ट्रॅक्‍टर रॅलीच्या विरूध्द एक घाणेरडे कारस्थान रचण्यात आले. आंदोलन सुरू झाल्यावर १५ दिवसांनी ज्यांनी आपापले गट दिल्लीच्या सीमांवर आणले, अशा दीप सिध्दू व इतरांशी समन्वय समितीचा व शेतकरी आंदोलनाचा काहीही संबंध नाही. २६ जानेवारीची ट्रॅक्‍टर रॅली उधळण्यासाठी रचलेल्या कारस्थानात सिध्दू व काही समाजकंटकांसह काही संघटनाही सहभागी होत. हेच लोक निर्धारित वेळेआधी दोन तास आपापले ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत घुसले व हिंसा पसरवत पुढे निघाले होते. हिंसाचाराबद्दल दोषी असलेल्यांविरूध्द कठोर कारवाई करावी.''
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com