शेतकरी नेते म्हणाले....होऊ द्या की चर्चा; आम्ही कधी मागे हटलो? - Farmer Leaders Answer to PM Modi's Appeal for Fresh Talks | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी नेते म्हणाले....होऊ द्या की चर्चा; आम्ही कधी मागे हटलो?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. त्याच वेळी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनस्थळांवरील इंटरनेट सेवा बंद केल्याबद्दल टिकैत यांनी तीव्र निषेध केला आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चेला सरकार कधीही तयार सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर, 'आम्ही चर्चेपासून कधी मागे हटलो होतो?' असा प्रतिप्रश्‍न शेतकरी नेत्यांनी विचारला आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, पुन्हा चर्चा सुरू करण्यास पंतप्रधानांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. त्याच वेळी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनस्थळांवरील इंटरनेट सेवा बंद केल्याबद्दल टिकैत यांनी तीव्र निषेध केला आहे. शहीदी पार्कमध्ये दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयांनी काल धरणे आंदोलन केले. २६ जानेवारीच्या हिंसाचारात ३०० हून जास्त पोलिस जखमी झाले होते.

लोकसभेतील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मोदी यांनी, शेतकरी कधीही सरकारशी चर्चा करू शकतात असे सांगून चर्चेची दारे अद्याप उघडी असल्याचे संकेत दिले होते. त्यावर टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.शिवकुमार कक्काजी यांनी सांगितले की शेतकरी नेत्यांनी चर्चेला कधीही नाही म्हटलेले नाही. मात्र तिन्ही कायदे मागे घ्या, या आमच्या पहिल्या मागणीपासून चर्चा सुरू व्हावी की ज्यास सरकारची तयारी नाही. तरीही आम्ही पुन्हा चर्चा करण्यास जरूर तयार आहोत. जर सरकारला शेतकरी एका कॉलच्या अंतरावर आहेत असे वाटत असेल तर आम्हीही सरकार केवळ एका रिंगटोनच्या अंतरावर असल्याचे मानतो. ज्या दिवशी सरकारकडून आम्हाला कॉलची घंटी वाजेल त्याच दिवशी आम्ही पुन्हा चर्चेला जाऊ. चर्चेनेच या कोंडीतून मार्ग काढता येईल.

गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना बळाने हटविण्यासाठी गुरूवारी मोठा फौजफाटा तैनात केला गेल्यावर आलेल्या दबावातून त्यांना भाषण करतानाच रडू कोसळले आणि त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पुन्हा संजीवनी मिळाली होती. त्यावर ते म्हणाले की माझे अश्रू वाहिले हे खरे आहे व ते देशातील शेतकऱ्याचे अश्रू होते.सरकारशी चर्चेला आम्ही कधीही तयार आहोत.

इंटरनेट बंद
हरियाणाबरोबरच आता राजधानी दिल्लीतील आंदोलनस्थळांच्या आसपासच्या परिसरातही इंटरनेट आज (ता. ३१) सायंकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे. यामुळे सीमाभागातील लोकांना पुन्हा मनस्ताप सुरू झाला आहे. इंटरनेट बंद केल्यचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. गाझीपूर, सिंघू, टीकरी सीमांवर इंटरनेट सेवा बंद करून, आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होत असतील तर या दडपशाहीने आंदोलन दबणार नाही असाही इशारा टिकैत यांनी दिला.

भारतीय किसान यूनियनचे (राजेवाल गट )अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी दिल्लीच्या सीमांवर २  फेब्रुवारीपर्यंत विक्रमी संख्येने शेतकरी दाखल होतील असा इशारा दिला आहे. त्यांनी २६ जानेवारीला दिल्लीत व काल सिंघू सीमेवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केला.

'आप'चा गंभीर आरोप
प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर रॅलीला हिंसक वळण लागून लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराला भाजपच जबाबदार आहे व भाजपने शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मदतीनेच हे कारस्थान रचले होते असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने केला आहे. या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण अधिकारिणीतर्फे (एनआयए) करावी अशीही मागणी आपने केली आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की आंदोलनाला बदनाम करण्यासाठी भाजपने या हिंसाचाराची रचना केली. भाजप नेते हेच सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी लोक आहेत व त्यांच्याविरूध्द देशद्रोहाचे गुन्हे प्रथम दाखल करावेत अशी मागणीही आपने केली आहे.

आम्ही शेतकऱ्याची पगडीही झुकू देणार नाही व सरकारलाही झुकायला लावण्याची आमची इच्छा नाही. पण जर आंदोलन दडपण्याचे प्रयत्न होतील तर शेतकरी तेच आहेत व ट्रॅक्‍टरही तेच आहेत हे सरकारने ध्यानात घ्यावे - राकेश टिकैत.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख