#SSRSuicide : रिया चक्रवर्ती अडकली ईडीच्या जाळ्यात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासावरुन मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकार आमनेसामने आले आहे. आता यात ईडीही उतरली आहे.
enforcement directorate registers case against actress rhea chakraborty
enforcement directorate registers case against actress rhea chakraborty

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्तीसह आणखी काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे दिवसेंदिवस या प्रकरणातील गुंतांगुत आणखी वाढत आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची पथकाने भेट घेतली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे. ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.बिहार पोलिसांच्या एफआयआरचा यासाठी आधार घेण्यात आला आहे. ईडीने रिया चक्रवर्तीवर आणि इतर काही जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  

सुशांतच्या खात्यावरुन रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांनी 15 कोटी रुपये काढून घेतले,  असा आरोप सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये केला आहे. या प्रकरणी सुशांतच्या आत्महत्येसह आर्थिक अनियमतता आणि कर चुकवेगिरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी  ईडी रिंगणात उतरली आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी ईडीकडून सुरू आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com