राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक, 'या' राज्यांत काँटे की टक्कर - elestions for 24 rajyasabha seats to be held on june 19 | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक, 'या' राज्यांत काँटे की टक्कर

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जून 2020

राज्यसभेच्या 24 जागांसाठी दहा राज्यांत निवडणूक होणार आहे. यात कर्नाटक आणि मध्य प्रदेशात जोरदार सामना पहायला मिळणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात या निवडणुकीमुळे राजकीय ज्वरही वाढू लागला आहे. 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 24 जागांसाठी 19 जूनला मतदान होईल असे जाहीर केले असून, यातील 18 जागांवरील मतदान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आले होते. यामुळे देश पातळीवर राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीत आंध्र प्रदेश 4 जागा, गुजरात 4, झारखंड 2, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन, मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.याचबरोबर जून आणि जुलैमध्ये निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या जागी नव्या सहा सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे. यात कर्नाटकातील चार आणि अरुणाचल व मिझोराममधील प्रत्येकी एक जागा आहे.  मतमोजणी 19 जूनला सायंकाळी होणार आहे. 

या निवडणुकीत सर्वाधिक रंगत कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये पहायला मिळेल. कर्नाटक आणि भाजपने सत्तांतर घडवून भाजपने नुकतीच सत्ता मिळविलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते जोतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये गेले आहेत. यामुळे या राज्यातील लढतींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये स्वत: ज्योतिरादित्य मैदानात आहेत आणि त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह हे असतील. 

मध्य प्रदेशात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंह सोलंकी तर, काँग्रेसकडून दिग्विजयसिंह आणि फूलसिंह बरैया हे निवडणूक लढवत आहेत. भाजपने पहिली पसंती ज्योतिरादित्य यांनी दिली असून, काँग्रेसने पहिली पसंती दिग्विजय यांना दिली असल्याने दोघांचा विजय नक्की मानला जात आहे. मात्र, तिसऱ्या जागेसाठी रस्सीखेच होणार आहे. कारण काँग्रेसमधून राजीनामा देऊन 22 आमदार बाहेर पडले होते. त्यामुळे हे गणित बिघडले आहे. 

कर्नाटकातही मध्य प्रदेशसारखी स्थिती आहे. कर्नाटकात बाराहून अधिक आमदारांनी बंडखोरी करुन धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसचे सरकार पाडले होते. आता राज्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडूणक होत आहे. जेडीएसकडून एच.डी.देवेगौडा आणि काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे नक्की मानली जात आहेत. आमदारांचे संख्याबळ पाहता काँग्रेस एक जागा आरामात जिंकेल आणि जेडीएस उमेदवाराला जिंकण्यापर्यंत पोचवू शकते. भाजपही दोन जागा सहजपणे जिंकू शकते. मात्र, भाजपने क्रॉस व्होटिंगच्या मदतीने तिसऱ्या जागेसाठी जोर लावल्यास जेडीएस उमेदवार अडचणीत येऊ शकतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख