'निवडून येणे' हाच भाजपचा ५ राज्यांच्या निवडणुकांत उमेदवारीचा निकष

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने निवडून येण्याची क्षमता हा निकष लावून केंद्रातील मंत्री आणि खासदारांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे
J P Nadda - Narendra Modi - Amit Shah
J P Nadda - Narendra Modi - Amit Shah

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने निवडून येण्याची क्षमता हा निकष लावून केंद्रातील मंत्री आणि खासदारांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार यादी जाहीर करताना भाजपने पश्चिम बंगालमध्ये केंद्रातील मंत्री बाबूल सुप्रियो यांना टाॅलिगंजमधून उमेदवारी दिली आहे. तर केरळच्या निवडणुकीत मेट्रो मॅन श्रीधरन यांना भाजपने पलक्कड मध्ये उमेदवार बनविले आहे.

भाजप मुख्यालयात ता. १३ रोजी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर व्यापक विचार विनिमय झाला होता. त्यापार्श्वभूमीवर सरचिटणीस अरुण सिंह यांनी काल पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ मधील भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली.

केरळमध्ये भाजप ११५ जागांवर लढणार असून उर्वरित २५ जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन दोन मतदार संघांमधून लढतील. तर, राज्यसभा खासदार के. जे. अल्फोन्स केरळमधील कनिरापल्ली विधानसभा मतदार संघातून लढतील. यासोबतच आसाममधील १७ मतदार संघांमधील उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली. या राज्यात भाजप 92 जागा लढविणार आहे.

तर, बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील २७ उमेदवारांच्या आणि चौथ्या टप्प्यातील 38 उमेदवारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबूल सुप्रियो यांच्यासोबतच खासदार लाॅकेट चटर्जी (चुनचुडा मतदार संघ), राज्यसभा खासदार स्वप्नदास गुप्ता (तारुकेश्वर मतदार संघ) यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे.

अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना अलिपूरद्वार या मतदार संघातून तर अलिकडेच तृणमूल काँग्रेसमधून भाजप प्रवेश केलेले माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांना डोम्जूर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच धर्तीवर अभिनेत्री पायल सरकार बेहालामधून तर अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती श्यामपूरमधून आणि अभिनेत्री अंजना बसू सोनारपूर दक्षिणमधून लढतील. याआधी भाजपने पश्चिम बंगालमध्ये  ५७ मेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आणखी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये भाजपने काँग्रेसमधून आलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांना थाऊजंड लाईट्स मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तर कोइंबतूर दक्षिण या मतदार संघात अभिनेत्रे कमल हसन यांच्या विरोधात भाजपने महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनथी श्रीनिवासन यांना लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com