आठ सदस्यांचे राज्यसभेतून आठवड्यासाठी निलंबन - Eight Suspended from Rajya Sabha | Politics Marathi News - Sarkarnama

आठ सदस्यांचे राज्यसभेतून आठवड्यासाठी निलंबन

वृत्तसंस्था
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक २०२०, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक २०२० ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. काल त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला होता. 

नवी दिल्ली : कृषी विषयक विधेयक मंजुरीच्या वेळी राज्यसभेत गोंधळ घातल्या बद्दल आठ सदस्यांचे एका आठवड्यासाठी निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी ही घोषणा केली. 

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक २०२०, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक २०२० ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. काल त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला होता. 

अध्यक्षांसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज आज (सोमवार) सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजीव सातव, के. के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सैयद नाझीर हुसेन व एलामारन करी अशी या सदस्यांची नांवे आहेत. 

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. कृषी मंत्र्यांचे उत्तर गोंधळामुळे सदस्यांना ऐकायला जात नव्हते. अखेर काही मिनिटांतच त्यांनी उत्तर संपल्याचे जाहीर केले. 

यामुळे विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींसमोर हौद्यात जाऊन रूलबुक फाडले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र, उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. या वेळी विरोधकांची घोषणाबाजीही वाढली. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांतील अनेक सदस्य आणि भाजपचे सदस्यांमध्ये जुंपल्याचे चित्रही काल पाहायला मिळाले. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख