...विकास दुबेवर झाली 'महाकालेश्वरा'ची अवकृपा! - Dreaded Gangster Vikas Dubey Arrested in Ujjain Mahakal Temple | Politics Marathi News - Sarkarnama

...विकास दुबेवर झाली 'महाकालेश्वरा'ची अवकृपा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जुलै 2020

गेल्या २ जुलैला मध्यरात्री उत्तर प्रदेशचे पोलिस विकास दुबेला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरारी झाला होता. आज त्याला पकडण्यात आले आहे. उजैन येथील महाकाल मंदीरात त्याला पकडण्यात आले

उज्जैन : कानपूरमधील आपल्या गावात २ जुलैला आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्याला उजैनमधील महाकाल मंदिरात ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने विकास दुबे पकडला गेल्याचे सांगितले गेले. 

गेल्या २ जुलैला मध्यरात्री उत्तर प्रदेशचे पोलिस विकास दुबेला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. त्यात एका अधिकाऱ्यासह आठ पोलिस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरारी झाला होता. आज त्याला पकडण्यात आले आहे.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उजैनमधील महाकाल मंदीरात विकास दुबे पुजा करण्यासाठी गेला होता. त्याने पुजेचे काही साहित्य विकत घेतले. त्यावेळी दुकानदाराला त्याचा संशय आला. विकास दुबेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचे ईनाम जाहीर केले होते. त्याची पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आली होती. तसेच विकास दुबे बाबतच्या बातम्यांचा माध्यमांवरही मारा सुरु होता. त्यामुळे दुकानदाराने त्याचा चेहेरा ओळखला.

या दुकानदाराने याची माहिती मंदीराच्या सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी विकास दुबेला थांबवून ठेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. त्यावेळी विकास दुबेने एक ओळखपत्रही दाखवले. ते पाहून सुरक्षा रक्षकांचा संशय बळावला. चौकशी सुरु असताना दुबेने या सुरक्षा रक्षकांशी दुरुत्तरे केली तसेच त्यांच्या अंगावरही धावून गेला. अखेर रक्षकांनी त्याला जवळच असलेल्या महाकाल पोलिस ठाण्यात नेले. तेथील अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अखेर त्याने आपणच विकास दुबे असल्याची कबूली दिली. 

दरम्यान, आज सकाळीच त्याच्या दोन साथीदारांचे पोलिसांनी एनकांउटर केले आहे. कानपूर आणि इटावा येथे हे दोन एनकाऊंटर झाले. कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एनकाऊंटरमध्ये दुबे याचा साथीदार प्रभात मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे. त्याला बुधवारी फरीदाबाद येथून अटक केली होती. कानपूर पोलिसांच्या हवाली करण्यासाठी त्याला कानपूर येथे आणले जात होते. यावेळी पोलिसांची गाडी पंक्चर झाली होती.

पोलिस ही गाडी ठिक करीत असताना त्त्यावेळी त्याने पळून जाण्यासाठी पोलिसावर हल्ला केला.  प्रभात मिश्रा याला पोलिसांची रिवॅाल्वर हिसकावून पोलिसांवर गोळिबार करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्याला गोळी लागली. यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान उत्तरप्रदेश पोलिसांनी दुसरा एनकाउंटर इटावा येथे केला. यात विकास दुबे याच्या साथीदाराचा मृत्यू झाला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. 

विकास दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना कानपूर येथे २ जुलैला रात्री घडली होती. यात आठ पोलीस ठार झाले असून, विकास दुबे हे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांचे सरकार उत्तर प्रदेशात असताना एका मंत्र्यांची हत्या केल्याचाही आरोप दुबे याच्यावर आहे. उत्तर प्रदेशात त्याच्यावर तब्बल ६०  गुन्हे दाखल आहेत. 

Edited By : Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख