donald trump daughter ivanka praises indian girl jyoti kumari | Sarkarnama

हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

इव्हांका ट्रम्प यांनी ज्योतीची दखल घेतल्याने तिची दुर्दम्य कहाणी जागतिक पातळीवर पोचली आहे. इव्हांका यांनी ज्योतीची संघर्षमय कहाणी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन प्रसिद्ध केली आहे. 

पाटणा : आजारी पित्याला घेऊन गुरुग्राम ते दरभंगा असा सायकल प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचे (वय १५) धाडस आणि हिंमतीची कहाणी अमेरिकेपर्यंत पोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कन्या इव्हांका ट्रम्प यांनी ज्योतीच्या निर्धाराचे कौतुक करून तिची संघर्षमय कहाणी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन प्रसिद्ध केली आहे. 

ज्योतीचे साहस अचाट 

इव्हांका ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ज्योतीचे अचाट साहस, सहनशीलता आणि प्रेम यांच्या सुंदर मिलाफातून भारतीय लोकांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडते. सायकलिंग ऑफ फेडरेशन ऑफ इंडियाचे लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेतले आहे. 

ज्योतीचे दुर्दम्य धाडस 

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील सिरहुल्ली गावातील मोहन पासवान हे ज्योतीचे वडील असून ते हरियानातील गुरुग्राममध्ये ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पण एका दुर्घटनेमुळे त्यांचे काम थांबले होते. आजारी वडिलांची सेवा करण्यासाठी ज्योती कुमारी गुरुग्रामला गेली होती. याच काळात कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू जाहीर झाले आणि ती तेथेच अडकली. वडिलांकडे पैसे नसल्याने दोघांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. अशातच प्रधानमंत्री मदतनिधीतून त्यांच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा झाले. ज्योतीने यात आणखी पैसे घालून एक जुनी सायकल खरेदी केली. त्यावर वडिलांना बसवून तिने घराकडे कूच केले. गुरुग्रामपासून सुमारे बाराशे किलोमीटर पॅडल मारत ज्योती वडिलांसह आठ दिवसांनी दरभंगाला पोचली. 

सायकलिंग चाचणीसाठी निमंत्रण 

ज्योतीने दाखविलेले धैर्य, धाडसाचे संपूर्ण देशात तिचे कौतुक होत आहे. दीर्घकाळ सायकल चालविण्याची क्षमता पाहून भारतीय सायकलिंग फेडरेशनने तिला चाचणीसाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र आत्ता येण्यास असमर्थता दर्शविल्याने संघटनेने तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलाविले आहे. अध्यक्ष ओंकारसिंह यांनी तिला शाबासकीसह आशीर्वाद दिले आहेत. 

मोफत शिक्षणाचा प्रस्ताव 

अनेक संस्था व व्यक्तीही ज्योतीला मदत करण्यास पुढे आल्या आहेत. आठवीत शिकणाऱ्या ज्योतीला मोफत शिकविण्याची आणि तिच्या वडिलांना नोकरी देण्याची तयारी बिहारमधील पकटोला येथील डॉ. गोविंदचंद्र मिश्रा एज्युकेशनल फाउंडेशनने दाखविली आहे. 

 

सायकल शर्यतीसाठी चाचणीत भाग घेण्यासाठी मला फोन आला होता. मला याचा खूप आनंद वाटत आहे, पण मी आत्ता शर्यतीत भाग घेऊ शकत नाही. माझे हात-पाय खूप दुखत आहेत. 
ज्योती कुमारी 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख